मुंबई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भानुशाली इमारत आज (गुरुवार) सायंकाळी कोसळली. ही इमारत अतिधोकादायक असल्याने ती नव्याने बांधण्यास पालिकेने परवानगी दिली होती. मात्र, मालकाने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. इमारतीच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या इमारतीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना म्हटले आहे.
आज (गुरुवार) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास मुंबई, फोर्ट, गोवा स्ट्रीट, लकी हाऊस जवळ, कबुतर खाना येथील भानुशाली इमारतीचा अर्धा भाग कोसळला. तळ अधिक चार अशी पाच मजली ही इमारत आहे. इमारत कोसळण्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मलाबा हटवला जात आहे. या इमारतीमध्ये रहिवाशी राहत असून अनेक रहिवाशी मलब्याखाली अडकले असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनकडून शोधकार्य सुरू केले आहे. मलाबा हटवून त्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक रहिवाशीही पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना मदत करत आहेत. दरम्यान इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काही रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
हेही वाचा - मुंबईतील मालाडमध्ये २ मजली चाळीचा काही भाग कोसळला; जीवितहानी नाही
घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान महापौर किशोरी पेडणेकर यांनी ई टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार ही इमारत जुनी मोडकळीस आली होती. यामुळे इमारत खाली करून त्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी परवानगी मालकाला देण्यात आली होती. मालकाने इमारत नव्याने बांधण्यास परवानगी असतानाही जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधलेली नाही. यामुळे अशा मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे महापौरांनी सांगितले. या इमारतीमधील रहिवाशांना काही दिवस पालिका राहण्याची सुविधा देईल मात्र त्यापुढे मालकाने त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे असेही महापौरांनी म्हटले आहे.