मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भानुशाली या इमारतीचा काही भाग आज (गुरुवार) सायंकाळी कोसळला. सदर इमारत ही म्हाडाची होती. म्हाडाने ती खाली करून पुढील कारवाई करायला हवी होती, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. तसेच आतापर्यंत इमारतीमधून 18 जणांना सुखरुपपणे बाहेर काढले असून दोन जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भानुशाली या इमारतीचा काही भाग आज (गुरुवार) सायंकाळी कोसळला. सदर घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच बचावकार्याची माहिती घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी, ही इमारत म्हाडाची असल्याचे सांगितले.
हेही वाचा - इमारत मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे : महापौर
मुंबईत अशा 16 हजार इमारती आहेत. या इमारतींचा केअरटेकर म्हाडा आहे. जी इमारत कोसळली त्यामध्ये 18 जण होते. त्यातील 12 जणांना बाहेर काढले. हे 12 जण स्वतः चालत आले, तर 6 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. बाहेर काढलेल्या 6 पैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळली त्याला लागून असलेल्या इमारतीच्या भागाला तडे गेले आहेत. त्यामुळे इमारत सध्या पूर्ण खाली केली असून एक जण अडकला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
या इमारतीचे केअर टेकर म्हाडा असल्याने त्यांनी अशा धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची गरज आहे. महापालिकेचे अग्निशामक दल असल्याने आम्ही रेस्क्यू करण्याचे काम करत आहोत. 2019 ला महापालिकेने या इमारतीला आयओडी दिली आहे. म्हाडाने त्या लोकांना बाहेर काढून नवीन इमारत बांधण्याबाबत कारवाई करायला हवी होती, असे आयुक्तांनी म्हटले आहे.