मुंबई - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील विविध पक्षाचे राजकीय नेते, शास्त्रज्ञ, पत्रकार, न्यायमूर्ती, निवडणूक आयुक्त यांच्यासह सुमारे तीनशेहून अधिक जणांवर पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आली. लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला असून या प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत सखोल न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, लीगल सेलचे कार्याध्यक्ष रवी जाधव यावेळी उपस्थित होते.
'केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा तर पंतप्रधानांची न्यायालयीन चौकशी करा'
पेगासस या हेरगिरी तंत्रज्ञानावर आधारित सॉफ्टवेअरचा वापर करून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी व त्यांचे सहकारी, देशातील व राज्यातील मंत्री, देशातील व राज्यांमधील अनेक राजकीय नेते, पत्रकार, शास्त्रज्ञ, न्यायमूर्ती, निवडणूक आयुक्त अशा सुमारे ३०० पेक्षा जास्त जणांचे फोन हॅक केल्याचा गौप्यस्फोट जगभरातील माध्यम संस्थांनी केला. २०१९ पासून हे फोन टॅपिंग सुरु आहे. देशातील मंत्र्यांचे व विरोधी पक्षातील नेत्यांचे व स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे फोन टॅप करणे हा लोकशाहीमध्ये त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. केंद्र सरकारचा काँग्रेसच्या वतीने आम्ही याचा निषेध करतो. तसेच कंपनीला तंत्रज्ञानामार्फत १० फोन हॅक करण्यासाठी ७० लाख रुपयांचा खर्च येतो. तर ३०० हून अधिक जणांचे फोन हॅक करण्यासाठी किती पैसे खर्च केला असेल, असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे देशातील राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश इत्यादी राज्यांतील बिगर भाजप सरकार पाडण्यासाठी सुद्धा या सॉफ्टवेअरचा वापर केल्याचा आरोप जगताप यांनी केला. हे प्रकरण गंभीर असून संपूर्णपणे जबाबदार असलेले गृहमंत्री अमित शाह यांचा त्वरित राजीनामा घ्यावा व त्यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष जगताप यांनी केली.
'मुंबईतील पुरस्थितीला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा'
रविवारी मुंबईमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईचई तुंबई झाली आहे. अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, मालाड या ठिकाणी भिंत व दरड कोसळून दुर्घटना झाल्या. यामध्ये ३२ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. अनेक दुकानदार, चाळकरी व तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला. सर्वांचे मोठे नुकसान झाले. याला मुंबईचे महापालिका प्रशासनच सर्वस्वी जबाबदार आहे. नालेसफाईचा उडालेला फज्जा, पर्जन्य जलवाहिन्याची सफाई न झाल्याने २१७ नवीन ठिकाणी पाणी तुंबले. भांडुपमध्ये तर जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी/उदंचन संयंत्रामध्ये पाणी शिरले. अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या असून वीजपुरवठा खंडित करावा लागला. एक दिवस पाणीपुरवठा बंद केला होता. मुंबईतील नागरिकांना त्यामुळे अतोनात त्रास सहन करावा लागला. या सर्व घटनेला मुंबई महानगरपालिकेचा गलथानपणा व निष्काळजीपणा जबाबदार आहे, असा आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केले. दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
'बीडीडी चाळीचा पुनर्विकासचे मार्गी लावा'
वरळी, ना.म. जोशी मार्ग, नायगाव व शिवडी येथे असलेल्या बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नियमित करून, या चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला आहे. या पुनर्विकासाचा लाभ बीडीडी चाळीतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेला आहे. परंतु सदरची अंमलबजावणी पोलीस विभागातर्फे करण्यात आलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्वसनाबाबत महाराष्ट्र शासनाला पोलीस विभागाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असताना, ते अजून शासनातर्फे उच्च न्यायालयात सादर केलेले नाहीत. राज्य शासनाने या परिस्थितीचा विचार करून तेथील वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलिसांना तेथील नागरिक समजून त्यांचे पुनर्वसन तिथेच करावे. तसेच पोलीस बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे जगताप यांनी सांगितले.
वकिलांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करा- जगताप
मुंबईतील दहिसरमध्ये काही दिवसांपूर्वी एका वकिलावर तलवारीने हल्ला झाला होता. उस्मानाबाद आणि बदलापूर येथे देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या वकिलांवर होणारे हल्ले हे निंदनीय आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी ज्याप्रमाणे पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारतर्फे कायदा केलेला आहे, तशाच प्रकारचा कडक कायदा वकिलांच्या बाबतीत सुद्धा करण्यात यावा, अशी मागणी भाई जगताप यांनी केली. तसेच मुंबई काँग्रेसच्या लीगल सेलच्या टीमकडून या संदर्भात प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - पेगॅससच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांचे राजभवनासमोर निदर्शने