मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डची पुनर्रचना आणि आरक्षण सोडत प्रक्रिया काही विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी केलेली आहे. असे आम्ही यापूर्वीही स्पष्ट केले होते. त्या संदर्भात आम्ही आमच्या हरकती व सूचना मांडल्या होत्या पण त्यातून फारसा काही फरक पडलेला दिसला नाही. आता वॉर्डची पुनर्रचना व आरक्षण प्रक्रिया होत असताना असे दिसून येत आहे की मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि प्रशासक इकबालसिंह चहल यांनी या आरक्षण सोडत प्रक्रियेत कुणाच्या तरी दबावाखाली येऊन शिवसेनेला फायदा करून दिला आहे आणि काँग्रेसवर अन्याय केलेला आहे आणि हा आमचा फक्त आरोप नाही आहे. यामध्ये शिवसेनाच डाव आहे असे म्हटले तरीसुद्धा अतिशयोक्ती होणार नाही, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला.
मुंबई काँग्रेस न्यायालयात जाणार - भाई जगताप पुढे म्हणाले की, आमचे आजच्या घडीला २९ नगरसेवक आहेत. या २९ जागांपैकी २१ जागांवर महिला आरक्षण पडलेले आहे. याला योगायोग म्हणता येणार नाही. कारण यामध्ये सोडत प्रक्रिया केल्याचे सांगितले जाते. एखाद्या वॉर्डचे आरक्षण ठरवताना खासकरून अनुसूचित वॉर्डचे आरक्षण ठरवताना ते मुळात त्या विभागात त्या समाजाची लोकसंख्या किती आहे हे पाहून ठरवले जाते. असा नियम आहे. पूर्ण दक्षिण मुंबई जिल्ह्यात ३० वॉर्ड्स आहेत. त्यातील २१ वॉर्ड्सना महिला वॉर्ड्स म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्यामध्ये सुद्धा ३ वॉर्ड्स अनुसूचित व महिला वॉर्ड्स आहेत. हे कसे काय होऊ शकते. शिवसेनेचे ९८ नगरसेवक आहेत, त्यातील २० ते २२ वॉर्ड महिला वॉर्ड झाले, तर भाजपचे ८० नगरसेवक आहेत, त्यातील १८ ते १९ वॉर्ड महिला वॉर्ड म्हणून आरक्षित करण्यात आले आणि काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत, त्यातील २१ वॉर्ड महिला वॉर्ड म्हणून घोषित करण्यात आले आहेत? एवढी तफावत कशी काय असू शकते, हा माझा सवाल आहे. हा आमच्यावर अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. आमचा आरोप आहे की मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्वग्रहदूषित आहे आणि काँग्रेस पक्षावर मोठा पक्षपात करण्यात आला आहे. त्याबाबत आमच्या हरकती, सूचना व आक्षेप ६ जून पर्यंत मुंबई काँग्रेस आणि आमचे सर्व नगरसेवक मांडणार आहोत आणि त्या जर मान्य झाल्या नाहीत व बदल केले गेले नाहीत, तर मुंबई महापालिका प्रशासन व आरक्षण सोडत प्रक्रिये विरोधात मुंबई काँग्रेस न्यायालयात जाणार आहे, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.
सुपारी घेऊनच काम करत आहेत - मुंबई मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा यावेळेस बोलताना म्हणाले की, माझी हि सातवी निवडणूक आहे. विभागातील लोकसंख्येच्या आधारावर महानगरपालिकेने वॉर्डची पुनर्रचना केली होती. पण वॉर्डची पुनर्रचना केल्यावर आरक्षण सोडत प्रक्रिया सुद्धा नव्याने करायला पाहिजे असा नियम आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी तसे न करता ५३ प्रभाग घोषित करून टाकले. शिवसेना व भाजपचे जास्त नगरसेवक असूनसुद्धा त्यांच्या जागांवर फार कमी प्रमाणात महिला वॉर्डचे आरक्षण झाले आहे आणि काँग्रेसचे मात्र फक्त २९ नगरसेवक असूनसुद्धा त्यामध्ये २१ वॉर्ड्स हे महिला वॉर्ड म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांनी जाणूनबुजून काँग्रेसला त्रास देण्यासाठी अशा प्रकारे आरक्षण केलेले आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल कुणाची सुपारी घेऊन काम करत आहेत का? असा सवाल रवी राजा यांनी उपस्थित केला. ते सुपारी घेऊनच काम करत आहेत असा माझा आरोप आहे, असेही रवी राजा म्हणाले.