मुंबई - आर्थिक कोंडीत सापडलेल्या 'बेस्ट'चे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी 'बेस्ट'च्या अर्थसंकल्पाचे पालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. निवडणुकीतही याबाबतचे वचन देण्यात आले. मात्र, अद्याप यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. याची आठवण करून देण्यासाठी आज मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय 'बेस्ट'च्या संयुक्त कृती समितीने घेतला आहे.
विलिनीकरणाबाबत आश्वासन -
मुंबई महापालिकेचा अंगीकृत उपक्रम असलेली 'बेस्ट' प्रचंड तोट्यात आहे. विविध उपक्रम राबवूनही 'बेस्ट'ला उत्पन्न मिळत नसून आर्थिक बोजा वाढतो आहे. 'बेस्ट'ला चालू आर्थिक वर्षात १८८७ कोटी ८३ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. दिवसेंदिवस हा तोटा वाढत असून आर्थिक संकटातून बाहेर येणे 'बेस्ट'ला कठीण जात आहे. त्यामुळे 'बेस्ट'चा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण करण्यासाठी आंदोलने करण्यात आली. याची दखल घेऊन शिवसेनेने 'बेस्ट'चा अर्थसंकल्प विलिनीकरणाबाबत आश्वासन दिले. पालिका निवडणुकीवेळीही याबाबतचे वचन शिवसेनेने दिले होते.
अंमलबजावणी नाही -
१४ ऑगस्ट २०१७ साली 'बेस्ट'च्या अर्थसंकल्प विलिनीकरणाचा ठराव 'बेस्ट' समितीत मंजूर करण्यात आला. त्यानंतर २६ ऑक्टोबर २०१७ ला महापालिकेच्या महासभेतही अर्थसंकल्प विलिनीकरणाचा ठराव मंजूर केला. मात्र, त्यानंतर आतापर्यंत याबाबतची अंमलबजावणी झालेली नाही. शिवसेनेची राज्यात व पालिकेतही सत्ता आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा शब्द पाळा, असे सांगण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे कृती समितीने म्हटले आहे.
हेही वाचा - पेट्रोल-डिझेलच्या महगाईचा 'भडका' थांबेना...सलग आठव्या दिवशी दरवाढ