मुंबई- बेस्ट भवन कुलाबा येथे मंगळवारी बेस्ट प्रशासनासोबत बेस्ट कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांच्या वेतनवाढ प्रश्नी व वाटाघाटी बाबत सकारात्मक चर्चा पार पडली. तसेच पुढील वाटाघाटीच्या बैठकीबाबत कृती समितीला बेस्ट उपक्रमाने लिखित आश्वासन दिले आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला बेस्ट संप तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा बेस्ट कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली.
बेस्ट कामगारांच्या प्रलंबित वेतन करार व इतर मागण्यांबाबत आंदोलनाची रणनीती आणि निर्णय घेण्यासाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्यावतीने परळ येथील शिरोडकर हॉल येथे मंगळवारी सांयकाळी बेस्ट कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात संप स्थगित करण्यात आला.
येत्या 15 दिवसांत बेस्ट उपक्रमाने बेस्ट कामगारांच्या वेतन प्रश्नी वाटाघाटी बाबत 5 तारखा निश्चित केल्या आहेत. 9, 13, 16, 19 व 20 ऑगस्ट रोजी या बैठका होतील. शेवटच्या दिवशी 20 तारखेला वाटाघाटी बाबत काय घडले याची माहिती कामगार मेळाव्यात ठेवण्यात येईल आणि त्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल असे शशांक राव यांनी सांगितले.
तसेच आजच्या निर्णयानंतर गाफील राहू नका. आज बेस्ट कामगारांनी एकजूट होऊन ताकद दाखवली आहे, वेळ आल्यास पुन्हा ताकद दाखवून देऊ, असे आव्हान यावेळी शशांक राव यांनी कामगारांना केले. कामगारांचा पगार 7930 रुपयांवरून थेट 21 हजार रुपये करण्याची मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली.