मुंबई - आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाने मंगळवारपासून तिकिटाच्या दरात कपात केली. यामुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दर कपातीनंतर तिकीट विक्रीत ५ लाखांची वाढ झाली आहे. तर बेस्टचे उत्पन्न तब्बल ६७ लाख रुपयांनी कमी झाले आहे. यामुळे दर कपातीनंतर बेस्टला होणारे नुकसान मुंबई महापालिकेने भरून काढावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते आणि बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी केली आहे.
बेस्ट उपक्रमावर २५०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार, थकबाकी तसेच उपक्रमाचा दैनंदिन कारभार चालवणे मुश्किल झाले होते. यावर उपाय म्हणून बेस्टने सुधारणा करण्याचे सुचवण्यात आले. त्यानुसार भाडेकपात आणि खासगी गाड्या भाड्याने घेण्याचे महापालिका आयुक्तांनी सुचवले होते. त्यानुसार बेस्टने टिकीट दरात कपात करुन ५ किलोमीटरसाठी ५ रुपये तर एसीसाठी ६ रुपये भाडे केले. त्याची अंमलबजावणी मंगळावरपासून करण्यात आली. बेस्टचे दर कपात केल्यामुळे बस स्टॉपवर प्रवाशांची गर्दी दिसत आहे. शेअर रिक्षा आणि टॅक्सीने जाणारे प्रवाशी भाडे कमी झाल्याने बेस्टकडे वळले आहेत.
बेस्टकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी दर कपात लागू करण्यापूर्वी सोमवारी ८ जुलै रोजी बेस्टच्या १७ लाख १५ हजार ४४० तिकीटांची विक्री झाली होती. त्यामधून बेस्टला २ कोटी १२ लाख ३३ हजार २६० इतके उत्पन्न मिळाले होते. मंगळवारी (९ जुलै) दर कपात लागू झाल्यावर बेस्टची २२ लाख १८ हजार २५३ इतकी तिकीट विक्री झाली आहे. त्यामधून बेस्टला १ कोटी ४५ लाख १८ हजार २५३ इतके उत्पन्न मिळाले आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी ५ लाख २ हजार ८१३ तिकीट विक्री वाढली असून ६६ लाख ९८ हजार ५६३ रुपयांनी उत्पन्न घटले आहे. बेस्टच्या तिकीट विक्रीत २९.३१ टक्क्यांनी वाढ झाली असून ३१.९५ टक्क्यांनी उत्पन्न घटले आहे.
बेस्टला होणारे नुकसान पालिकेने भरुन काढावे
दर कपातीचा निर्णय चांगला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा फायदा झाला आहे. दर कपातीनंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. बस स्टॉप आणि डेपोमध्ये प्रवासी बसची वाट बघत आहेत. मात्र, बस वेळेवर येत नाही म्हणून प्रवासी इतर मार्गाचा प्रवासासाठी वापर करत आहेत. बेस्टने आधी २ हजार बसेस घेऊन नंतर दर कपातीचा निर्णय घेतला असता तर प्रवाशांना वेळेवर बस मिळाल्या असत्या. पालिका आणि बेस्टकडे नियोजन नसल्याने प्रवासी वाढले असताना बसची वाट बघावी लागत आहे. दर कपातीनंतर बेस्टच्या उत्पन्नात जी काही घट झाली आहे, ती घट पालिकेने भरुन काढावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते आणि बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी केली आहे.