मुंबई - बेस्टच्या बस डिझेल, सीएनजी व इलेक्ट्रिकवर चालतात. डिझेलमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रीक बसचा ताफा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या मालकीच्या ६ इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावत आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३४० इलेक्ट्रीक ताफ्यात येणार आहेत. त्यापैकी ३२ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात एकूण ३८ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत.
मुंबईत प्रवासासाठी लाईफलाईन म्हणून ओळख असलेली रेल्वे सेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना व सामान्य प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचवण्याचे काम बेस्टकडून केले जात आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होताना बेस्ट बसने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा होती. त्यावेळी बेस्टमधून अडीच लाख प्रवासी प्रवास करत होते. ८ जून पासून सर्वसामान्य प्रवाशांना बेस्ट बस मधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढून १६ लाखांवर पोहोचली आहे.
बेस्टकडे ३५५० बसचा ताफा आहे. त्यात डिझेल, सीएनजी बसचा ताफा अधिक आहे. बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या ६ इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावत आहेत. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत आहे. तसेच इंधनाच्या धुरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. भविष्यात इलेक्ट्रीक गाड्याच रस्त्यावर धावणार आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील ३४० इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार आहेत. त्यापैकी भाडेतत्त्वावरील ३२ बसेस दाखल झाल्या आहेत. मालकीच्या ६ आणि भाडेतत्त्वावरील ३२ अशा एकूण ३८ इलेक्ट्रीक बसेस प्रवाशांना सेवा देणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्रदूषणमुक्ततेसाठी इलेक्ट्रीक गाड्यांवर भर दिला जात आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस दाखल करण्यात येत आहेत. सध्या बॅकबे व वरळी बस आगारात चार्जिंग स्टेशन उभारली आहेत.