नवी मुंबई - खारघरमधील प्रेमभंग झालेल्या तरूणीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बंगाली बाबाच्या नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून मुसक्या आवळल्या आहेत. प्रियकराचे दुसऱ्या मुलीबरोबर लग्न ठरल्याने तरूणी वैफल्यग्रस्त झाली होती. रेल्वेत लावलेल्या बंगाली बाबाच्या जाहिरातीला आकृष्ट होऊन प्रियकराने आपल्याकडे पुन्हा यावे म्हणून बंगाली बाबाची मदत घेतली होती. मात्र, बंगाली बाबाने भावनांचा फायदा घेत तरूणीला तब्बल साडे चार लाखांना गंडा घातला आहे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणींने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेशातील मेरठ येथील बंगाली बाबाच्या मुसक्या आवळल्या आहे.
प्रेमभंग झाल्याने तरूणी वैफल्यग्रस्त -
खारघरमधील तरुणीचे एका तरुणांवर अतोनात प्रेम होते. मात्र, तिच्या प्रियकराने त्या तरुणींला धोका देत तिच्या बरोबर लग्न करण्यास नकार दिला. दुसऱ्यांच एका तरूणीशी त्याने विवाह देखील ठरला होता. त्यामुळे प्रेमभंग झाल्याने पीडित तरुणी ही वैफल्यग्रस्त झाली होती.
बंगाली बाबाची जाहिरात पाहून तरुणीने आकृष्ट -
प्रेम संबंधातील अडचणीत उपाय पाहिजे असेल तर मोबाईल क्रमांकावर संपर्क करा असे ट्रेनमधील जाहिरातीवर लिहिले होते. त्यामुळे ती वैफल्यग्रस्त तरुणी या जाहिरातीकडे आकृष्ट झाली. या जाहिरातीमुळे तरुणीला आपला प्रियकर आपल्याकडे परत येईल ही आशा वाटू लागली. त्यामुळे तिने बंगाली बाबाच्या जाहिरातीवरील क्रमांकावर संपर्क साधला होता.
काळ्या जादूसाठी दिले साडे चार लाख -
या बंगाली बाबाने पीडित तरुणीचा प्रियकर तिच्याकडे परत येण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी काळी जादू करावी लागेल असे तरूणीला सांगण्यात आले. यासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल असे सांगितले. यासाठी वेळोवेळी युवतीकडून पूजा विधीसाठी खर्च म्हणून कबीर खान बंगाली बाबाने (33) 4 लाख 57 हजार रुपये घेतले होते.
काळी जादू करण्याची दिली धमकी -
बंगाली बाबाने सांगितल्याप्रमाणे काळ्या जादूचा पूजाविधी करूनही काहीही फरक पडला नाही व तरुणीच्या प्रियकराने तिच्याकडे परत येण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे तिने बंगाली बाबा कडे पैसे परत मागितले. मात्र, त्या बाबाने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तरुणीने पोलिसात तक्रार देईन अशी बाबाला धमकी दिली. मात्र, जर पोलिसांना सांगितले तर तिच्यावर तो काळी जादू करून अपघात घडवून आणील व तिला नष्ट करील अशी धमकी त्या बाबाने तरुणीला दिली. यामुळे तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
गुगल पेद्वारे पाठवले पैसे -
तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याचा तपास करीत आरोपी वसीम रईस खान उर्फ कबीर खान बंगाली वय वर्ष 33 याला उत्तर प्रदेश मेरठ येथून मोठ्या शिताफीने नवी मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तरुणीने बंगाली बाबाला गुगल पेद्वारे पैसे पाठवले असल्याच्या एन्ट्री दिसून आल्या आहेत व संबधित तरूणीची फसवणूक केल्याचे त्याने कबूल केले आहे.