मुंबई - मुंबईची राणीबाग ही पर्यटक आणि बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण.मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन, वाघ, बिबट्या आदी प्राणी पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यात आता शिवानी व शिवा या अस्वलाच्या मस्तीचा अनुभव पर्यटकांना घेता येत असल्याची माहिती राणी बाग प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राणी बागेत पर्यटकांची संख्या वाढतेय - भायखळा येथे मुंबई महापालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय आहे. हे उद्यान व प्राणीसंग्रहालय राणी बाग म्हणून ओळखले जाते. त्यात दुर्मिळ झाडे, पक्षी, प्राणी आहेत. ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक राणी बागेत येतात. राणी बागेत काही वर्षांपूर्वी परदेशी पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची संख्या वाढू लागली. राणी बागेचा महसूलही वाढू लागला. करिश्मा शक्ती वाघाच्या जोडीही पर्यटकांना आकर्षित करत आहे. राणी बागेत दररोज १५ ते १६ हजार पर्यटक भेट देतात. शनिवार, रविवार पर्यटकांची संख्या २५ हजारांच्या घरात पोहोचते.
अस्वलाच्या जोडीची धमाल - त्यानंतर आता "शिवानी" अस्वलाच्या च्या सोबतीला "शिवा" नर आणण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आणलेल्या ‘शिवा’ला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यानंतर आता मादीसोबत सोडण्यात आले आहे. या दोघांची जोडी चांगलीच जमली आहे. या दोन्ही अस्वलांचे वय सुमारे ५ ते ६ वर्षे आहे. या अस्वलांना कलींगड, पपई, चिकू, पेरू, काकडी, गाजर, तांदळाची खीर, पेज अशा प्रकारच्या आहाराचा मेनू दिला जातो असे राणी बागेतील जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी सांगितले.
राणी बाग - पालिकेच्या या उद्यान व प्राणी संग्रहालयात नऊ पेंग्विन, दोन वाघ ( वाघाने नुकताच एका ब छड्याला जन्म दिला आहे), शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत.