मुंबई - मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत येत असून प्रचार फेऱ्यात उमेदवारांना मतदारांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. 'हरवलेले खासदार भेटीसाठी येत आहेत' अशा फलकांनी बीडीडी चाळीतल्या रहिवाशांनी शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांचे स्वागत केले.
महावीर जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोअर परेल भागत मोठी प्रचार रॅली काढली. मात्र, या प्रचार रॅलीत ना. म. जोशी मार्गावरील बीबीडी चाळ वासीयांच्या रोषाला सावंत यांना सामोरे जावे लागले. मात्र, आमदार सुनील शिंदे आणि पोलिसांच्या मध्यस्तीनंतर रॅली पुढे गेली.
बीबीडी चाळ रहिवाशांनी हरवलेले खासदार आपल्या भेटीला येत आहेत, असे निषेधाचे फलक लावले होते. तर बीडीडी चाळींच्या विकासाचा करारनामा झाल्याशिवाय मत मागू नका, असेही फलक लावण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे त्या चाळीतील रहिवाशांना विकासाची स्वप्ने दाखवली जात आहेत. मात्र, अद्याप यात कसलीही प्रगती झाली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याचा जाब विचारण्याचा प्रयत्नही रहिवाशांनी केला. मात्र, तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी रहिवाशांना पांगवले. मराठी भाषिक भागात शिवसेनेच्या उमेदवाराला मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागल्याने दक्षिण मुंबई मतदारसंघात सेनेसाठी ही लढत सोपी नसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.