मुंबई - मुंबईमध्ये गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज मंगळवार (१४ सप्टेंबर)रोजी पाच दिवसांच्या गणेश मूर्तीं आणि गौरींचे विसर्जन केले जात आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५१४८ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी २८६० गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू राहणार असून, आतापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
निर्बंधांत विसर्जन
मुंबईमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशा एकूण २ लाख मुर्त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. या मुर्त्यांचे दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी विसर्जन केले जाते. मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी सोयी सुविधा पुरवल्या आहेत. तसेच, भाविक विसर्जनासाठी थेट पाण्यात जाणार नाही याची काळजी घेण्यात आली. पालिका कर्मचारी भाविकांकडून मुर्त्या आपल्या ताब्यात घेऊन नैसर्गिक व कृत्रिम तलावात विसर्जन करत आहेत.
५१४८ गणेश मूर्तींचे विसर्जन
आज सकाळी ११ ते १२ च्या सुमारास गणेश व गौरी मूर्त्यांचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५१४८ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ४४ सार्वजनिक, ४५५३ घरगुती आणि ५५१ गौरींचे विसर्जन करण्यात आले. एकूण ५१४८ पैकी २८६० मूर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक २५, घरगुती २५४७ तर २८८ गौरींचा समावेश होता. रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन सुरू राहणार आहे.
७३ नैसर्गिक व १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव
मुंबई शहरात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकार आणि पालिकेने निर्बध लागू केले आहेत. त्यानुसार भाविकांनी विसर्जनस्थळी गणेश मुर्त्या पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करायच्या आहेत. पालिका कर्मचारी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करणार आहेत. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे. तसेच, सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गणेशमूर्ती संकलन केंद्रे
मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर उपलब्ध महापालिकेच्या व्यवस्थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्यापूर्वी मूर्तीची पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
तर साथरोग कायद्यानुसार कारवाई
मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. उत्सव प्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होईल, अशी कोणतीही कृती करू नये. अन्यथा, अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, अंतर्गत कारवाईस पात्र ठरेल असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
निर्विघ्न विसर्जन व्हावे हाच प्रयत्न
नागपूर खंडपीठाने नैसर्गिक ठिकाणी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करू नये, असे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन केले जाईल. बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावे हाच आमचा प्रयत्न असून, त्यासाठी मुंबईमधील विसर्जन स्थळांची संख्या वाढवण्यात येईल. सोसायट्यांमध्ये विसर्जनाची व्यवस्था केली जाईल. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. पालिका प्रशासनाचे कर्मचारी विसर्जनासाठी येणाऱ्या मूर्ती चौपाटीबाहेरच स्वत:कडे घेऊन विसर्जीत करतील. त्यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण आहे. बाप्पाबद्दलच्या संवेदना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घेऊ. गणेश विसर्जनाला मुंबईकर आले, तर निर्विघ्न विसर्जन व्हावे हाच प्रयत्न असल्याचे महापौरांनी सांगितले. विसर्जनावेळी नागरिक गर्दी करू नयेत, यासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार आहे असे महापौरांनी सांगितले.