मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. मुंबईतील काही भागात शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला. कांजूरमार्गमध्ये राऊत यांच्या समर्थनार्थ ( Sanjay Raut support banner Kanjurmarg ) लागलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. बॅनरवरून भाजपसह केंद्रीय तपास यंत्रणांना इशाराच देण्यात आला आहे.
हेही वाचा - CNG price hike: सीएनजीसह पीएनजी पुन्हा महागला.. रिक्षा, टॅक्सीचे भाडे महागण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या रडारवर आले आहेत. मंगळवारी मुंबईसह रायगड भागातील राऊत यांच्याशी निगडित असलेल्या मालमत्तांवर ईडीने जप्ती आणली. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी राऊत यांच्यावर दबाव टाकला जातोय, असा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला. तर, संजय राऊत यांच्या मतदारसंघात भाजप आणि ईडीच्या विरोधात तीव्र निर्दशने करण्यात आली. तसेच, कांजुरमार्ग भागात संजय राऊत यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेली बॅनरबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मराठी शब्दात बोलायचे झाल्यास, आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो. माझ्या मस्तकाला जरी बंदुक लावली तरी मी घाबरणार नाही, अशा आशयाचा इशारा संजय राऊत यांनी ईडीला दिला होता. त्या वक्तव्याचे फलक सर्वत्र लागले आहेत. संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत.
किरीट सोमैया बोलतात आणि दोन - तीन दिवसांनी कारवाई होते. त्यामुळे, अॅक्युरेट प्रेडिक्शन करणारे गृहस्थ म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय यंत्रणा कोणतीही कारवाई करताना सोमय्या यांना त्याची कल्पना देऊन कारवाई होते, असा आभास निर्माण होतो. या सगळ्याचा सरकारवर काही परिणाम होणार नाही. केवळ सरकार व सरकारमधील लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा वापरल्या जातात, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर दबाव टाकण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सेना भवनाबाहेर मनसेचे बॅनर : दादर परिसरात सेना भवनाबाहेर मनसेचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आहे. बॅनरमध्ये, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालताहेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढत आहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता माननीय राज ठाकरे चालवत आहेत. जमल्यास उद्धवजींना हिंदूबद्दल सुबुद्धी द्या, अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनाबाहेर लावण्यात आलेले आहे.
हेही वाचा - Saurabh Tripathi : खंडणी प्रकरणात सौरभ त्रिपाठीच्या मेव्हण्याला उत्तर प्रदेशमधून अटक