मुंबई - गिरणी कामगारांच्या घरांच्या वितरणाची प्रक्रिया राबवण्यासाठी नव्या नियमानुसार आता राष्ट्रीयकृत बँकाची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. त्यानुसार बँक निवडीसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा मागवली आहे. पण या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही. केवळ एकच निविदा आल्याने मंडळाने निविदेला मुदतवाढ दिली आहे. आता या मुदतवाढीत तरी प्रतिसाद मिळेल का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
'या' बँका आतापर्यंत करत होती कामे -
म्हाडाची सर्वसामान्यासाठीची लॉटरी असो वा गिरणी कामगारांची लॉटरी, लॉटरीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. अगदी अर्ज भरून घेण्यापासून ते घराचे वितरण करण्यापर्यंत. तर ही अर्ज भरून घेण्यापासून ते घराची रक्कम भरण्यापर्यंतची प्रक्रिया बँकेच्या माध्यमातून केली जाते. यासाठी निविदेच्या माध्यमातून बँकेची निवड केली जाते. त्यानुसार आतापर्यंत गिरणी कामगारांच्या लॉटरीचे काम कोटक बँक आणि मुंबै बँककडे आहे. आता मात्र नव्या बँकाची निवड मुंबई मंडळाला करावी लागणार आहे.
नव्या आदेशानुसार निविदा -
कोटक बँक आणि मुंबै बँक या दोन बँका काम करत होत्या, पण आता मात्र नव्या बँकेची नियुक्ती करावी लागणार आहे. कारण सरकारच्या नव्या आदेशानुसार आता सरकारी यंत्रणाची कामे ही राष्ट्रीयकृत बँकेकडूनच करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे 28 जानेवारीला मुंबई मंडळाने गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरीच्या कामासाठी बँक नियुक्त करण्यासाठी निविदा मागवली होती. 8 फेब्रुवारीला निविदा खुल्या केल्या जाणार होत्या. पण निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने, केवळ एकच निविदा आल्याने आता 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तर यावेळी नक्की प्रतिसाद मिळेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. तेव्हा त्यांचा हा विश्वास खरा ठरतो का हे लवकरच समजेल.