मुंबई - वांद्रे पूर्व येथील स्कायवॉक हा अनेक शासकीय कार्यालयांना जोडतो. दुरुस्तीकरिता हा स्कायवॉक मार्चमध्ये बंद करण्यात आला. मात्र, नागरिकांची होणारी गैरसोय पाहता हा पूल पुन्हा सुरू करण्यात आला. आता पुन्हा पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून हा पादचारी पूल पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे. यामुळे अरुंद रस्त्यातून मार्ग काढत नोकरदार वर्गाला रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे.
सीएसएमटी येथे झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर पालिका सतर्क झाली आहे. सद्या धोकादायक पादचारी पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. वांद्रे येथील स्कायवॉक हा वांद्रे स्थानक ते वांद्रे न्यायालय तसेच एसआरए कार्यालयापासून कला नगर असा पसरला आहे. यातील एसआरए ते कला नगर हा भाग वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी, सागरी सेतू उड्डाणपुलाच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. या स्काय वॉकचा उर्वरित भागाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
स्काय वॉकचे काम सद्य स्थितीत सुरू आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेकडून फलक लावण्यात आले आहेत.