मुंबई - राजकीय द्वेषासाठी भाजपकडून केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला जात आहे. भाजपच्या असंख्य नेत्यांवर अनेक आरोप असतानाही त्यांच्यावर कधीही ईडीची कारवाई होत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईचा बाळासाहेब थोरात यांनी निषेध केला. ते म्हणाले, की भाजपकडून केवळ राजकीय द्वेषासाठी कारवाया केल्या जात आहेत. हे देशातील जनतेला कळत आहे. तक्रारी नसतानाही भाजपच्या विरोधातील लोकांवर केवळ राजकीय द्वेषापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला.
भाजपचे ऑपरेशन कमळ यशस्वी होईल, असे वाटत नाही-
महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण होत असतानाच भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यात भाजपाचे सरकार पुन्हा येईल असे भाकित केले. राज्यात भाजपकडून ऑपरेशन कमळ होईल का, असे विचारले असता थोरात म्हणाले की, राज्यात भाजपचे ऑपरेशन कमळ यशस्वी होईल, असे वाटत नाही. तर दानवे हे कायमच असे दावे करत असतात. त्यामुळे त्यांनी हे दिवास्वप्न पाहत राहावे, असा टोला थोरात यांनी लगावला. फडणवीस यांनीही 'मी येणार' असेच म्हटले होते. त्यामुळे राज्यात सत्ता नसल्याचे भाजपचे लोक बैचैन झाल्याची टीका थोरात यांनी केली.
हेही वाचा-प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचा छापा; शिवसेनेचे आणखी नेते रडारवर..
केंद्राकडून राज्याला सापत्न वागणूक-
राज्यातील वीज बिल माफीवर थोरात म्हणाले की, वीज बील माफी द्यावी, ही आमची भूमिका आहे. नागरिकांना मदत केली पाहिजे. अतिवृष्टी झाल्यानंतर आम्ही 10 हजार कोटींचे पॅकेज दिले होते. मात्र, त्यानंतर आजही केंद्राचे पथक आले नाही. केंद्राने मदतही दिली नाही. केंद्र सरकार राज्याला सापत्न वागणूक देते. यामुळे याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. क्रूड ऑइल किंमत कमी झाली असतानाही केंद्र सरकार नफेखोरी करत आहे. तर दुसरीकडे आज आर्थिक स्रोत कमी झाले आहेत. तरीही केंद्र मात्र अद्याप मदत करत नसल्याचा आरोपही थोरात यांनी केला.
हेही वाचा-ईडी काय इंटरपोलला आणा आम्ही घाबरत नाही, संजय राऊतांचा भाजपला इशारा
आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज छापे-
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज पहाटेच ईडीचे छापे पडले. त्यांच्या ठाण्यातील घरांसह, मुंबईतील घरे आणि कार्यालयांवरही ईडीच्या पथकांचे छापे सुरू आहेत. आज पहाटे सहा वाजेपासूनच ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई योग्य असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, तर ही कारवाई राजकीय आकसापोटी होत असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईचे स्वागत केले आहे.