मुंबई - पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा द्या, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. त्यांनी तातडीने पत्रकारांचे लसीकरण करावे, अशीसुद्धा मागणी केली आहे. याबाबत थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
पत्रकार मंडळी बातमीदारीच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतात, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना संसर्गाचा धोका अधिक आहे. तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यांतील सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर पत्रकारांना लसीकरण करण्याची मागणी या वेळी थोरात यांनी केली.
अधिस्वीकृती धारक पत्रकार वगळता राज्यातील अन्य पत्रकारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या अधिस्वीकृती धारक पत्रकारांपेक्षा जास्त आहे. या प्रश्नाकडे राज्यातील पत्रकार संघटनांनी अनेक वेळी सरकारचे लक्ष वेधले आहे.