मुंबई - राज्यात सत्तास्थापनेसाठी आम्ही तीन तीन अंकी नाटकात यशस्वी झालेलो दिसू, मात्र हा तीन अंकी नाटकाचा शेवट भाजपला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबईत दिली.
हेही वाचा - आशिष शेलार खोटं बोलतात पण रेटून बोलतात - जितेंद्र आव्हाड
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज सकाळी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सेना - काँग्रेस - राष्ट्रवादीच्या तीन अंकी नाटकाचा शेवट चांगला होणार नाही, अशी खोचक टीका केली होती. त्याचा समाचार घेत थोरात यांनी आज ही प्रतिक्रिया दिली.
दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू असून बैठकीत वाशिम, अकोला, धुळे, नंदूरबार जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे. यावेळी थोरात यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले, भाजप हे निवडणुकीत २२० जागा मिळतील अशा गप्पा मारत होते. त्याचे काय झाले? कुठे आले? असा सवाल थोरात यांनी केला. त्यामुळे भाजप नेत्यांचे बोलणे आणि वस्तुस्थिती त्यांनी लक्षात घ्यावी, असेही ते म्हणाले. गडकरी यांनी महाशिवआघाडीच्या संदर्भात टीका करताना क्रिकेटच्या मॅचमध्ये शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते तसे राजकारणात होते, असे म्हटले होते. त्यावर थोरात म्हणाले की, गडकरी हे मित्र आहेत, क्रिकेटच्या मॅचमध्ये बॉल दिसतो, येथे बॉल दिसत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला दिला.
हेही वाचा - काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट
मुख्यमंत्री किती वर्षाचा होईल यावर अजून काही ठरले नाही. मात्र, जे काही होईल ते दिल्लीत होईल. पक्ष म्हणून आम्ही वेगळे बसत आहोत, आमची दिशा ठरवणार आहोत. सत्ता स्थापन करण्यासाठी फार दिवस वाट पहावी लागणार नाही, असेही थोरात यांनी सांगितले.
अनेक गोष्टी आहेत, त्यावर आम्ही बसत आहोत. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची भेट कधी होणार हे मला माहीत नाही, मात्र सेनेचे नेते संजय राऊत हे एक विचार घेऊन चालणारे नेते आहेत. प्रभावी नेते आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची उशिरा भेट घेतली. या भेटीसाठी त्यांनी खूप उशीर केला. त्यांपूर्वी आम्ही राज्यपालांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री पदासोबत आमचे अनेक निर्णय हे दिल्लीत होणार आहेत. ते लवकरच होतील. तसेच सत्तास्थापन करण्यासाठीची लवकर माहिती दिली जाईल, असेही ते म्हणाले.