मुंबई - दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव मुंबईतील 'ईस्टर्न फ्री वे'ला देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बुधवारी केली होती. मात्र, या रस्त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी आम्ही अगोदरपासून करत होतो, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर यांनी सांगितले. त्यामुळे या रस्त्याला बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा... 'संजय राऊतांच्या विधानाने सर्वांची मान खाली गेली, या माणसाच्या बुद्धीला काय झाले?'
दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी 'पी डिमेलो रोड' ते 'पूर्व द्रुतगती महामार्ग' यांना चेंबूरपर्यंत जोडणारा १६.८ किमी लांबीचा मार्ग तयार करण्यात आला आहे. यामुळे वाहनांना जलदगतीने दक्षिण मुंबईत पोहोचता येईल. 'ईस्टर्न फ्री वे'च्या उभारणीत विलासराव देशमुख यांचे योगदान होते. त्यांचे नाव 'ईस्टर्न फ्री वे'ला देण्याचे ठरवण्यात आले आहे. मात्र या फ्री वे ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.
काय म्हणाले अविनाश महातेकर ?
ईस्टर्न फ्री वे'च्या उभारणीवेळी या मार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. हा मार्ग पूर्ण झाल्यावर आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मागणी केली होती. त्यामुळे आमचा पक्ष या मार्गाला बाबासाहेबांचे नाव मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे.
जेव्हा या मार्गाची आखणी होत होती तेव्हा मार्गाच्या जमिनीवरती, मानखुर्द शिवडी, पंजारपोळ या ठिकाणी मोठी झोपडपट्टी होती. झोपडपट्टी हटवून मार्ग तयार करणे हे खूप जिकीरीचे काम होते. परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करत या झोपडपट्टी खाली करण्याचे काम केले. त्यामुळे या मार्गाला बाबासाहेबांचे नाव मिळावे, अशी भावना त्यावेळीच अधिकाऱ्यांसमोर मांडली असल्याचे महातेकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा... शिवाजी महाराजांची उपाधी 'छत्रपती' हीच होती, 'जाणता राजा' नव्हे - शरद पवार
नामाविधान समितीकडे कोणती नावे या फ्री वे सुचवण्यात आली होती, याचा तपशील जाहीर झाला नाही. आम्हाला व्यक्तिशः विलासराव देशमुखांचा आदर आहे. त्यांच्या नावाला आमचा विरोध नाही. नामाविधान समितीने याचा पुनर्विचार करावा. आम्ही मागणी का करत आहोत याचा विचार करावा आणि या 'फ्री वे'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, असे महातेकर यांनी म्हटले आहे.