मुंबई - ब्रिटिशांनी भारतात बस्तान बसवल्यानंतर सुरुवातीपासूनच सत्ता विस्तारासाठी 'फोडा आणि झोडा' या नीतीचा वापर केला होता. ब्रिटीशांनी सत्तांतरानंतरही उभय देशांमध्ये कायम वैमनस्य राहील, अशी व्यवस्था केली. त्या फाळणीच्या वेदना घेऊन आजही प्रत्येक भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक यांत एकमेकांबद्दल तिरस्कार असल्याचा दिसून येतो.
भारताच्या फाळणी होण्यात ब्रिटीशांचेच हितसंबंध
काँग्रेसच्या स्थापनेनंतर भारतात राजकीय स्वातंत्र्याची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांना हे समजून आले होते कि, आज ना उद्या आपल्याला भारताला सोडावे लागणार आहे.
भारत अखंड राहिला तर भविष्यात आपल्याला भारतापासून धोका असू शकतो, अशी भीती इंग्रजांना वाटत होती. भारताचे उपखंडातील स्थान पाहता ते सत्यही होते. विभागीय सत्ता म्हणून उद्या भारत उदयास आला तर आपल्याला त्रास होऊ नये, म्हणून देश सोडून जाण्या अगोदर अखंड भारत फूट पाडण्यासाठी इंग्रजांचे हात शिवशिवायला लागले होते. त्यांच्या एकंदर सैतानी कृत्यांचा परिपाक म्हणजेच भारताची झालेली फाळणी आणि पाकिस्तानचा जन्म होय.
भारताच्या फाळणीबद्दल काही महत्त्वाचे
- १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण सीमांची घोषणा मात्र १७ ऑगस्टला करण्यात आली.
- फाळणीनंतर पूर्व आणि पश्चिम असा विभागलेल्या पाकिस्तानची निर्मिती झाली.
- पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असा एकूण ३,६६,१७५ चौरस मैलांचा प्रदेश पाकिस्तानकडे गेला.
- फाळणी नंतर साधारणतः १.४५ कोटी लोकांचे स्थलांतर करण्यात आले. जगातील हे आजपर्यंतचे सर्वात मोठे स्थलांतर ठरले.
- फाळणी नंतर झालेल्या दंगली मध्ये साधारणतः १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
- फाळणीनंतरही एक तृतीयांश मुस्लीम हे भारतातच राहीले होते.
१५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र होत असलेल्या भारतात सर्वत्र आनंदोत्सव होता, मात्र हा आनंद निर्भेळ नव्हता. कारण इंग्रज देश सोडून चालले होते, मात्र, अखंड भारताची फाळणी करून एक भळभळती जखम सर्व भारतीयांच्या उरावर करूनच ते गेले होते.