मुंबई - राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 15 वा वर्धापन दिन आहे. पण कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मनसेकडून वर्धापन दिनाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक भावनिक ऑडिओ क्लिप प्रसारित करत कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांना सदस्य मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
गेल्या पंधरा वर्षांच्या प्रवासात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या बळावरच हा पल्ला गाठता असल्याचा एक रेकॉर्डेड संदेश कार्यकर्त्यांना उद्देशून प्रसिद्ध केला आहे. पक्षाच्या पंधरा वर्षाच्या कालावधीत अनेक खाचखळगे पाहिले, अनेक जण सोडून गेले, पण जे सोबत आहेत ते सह्याद्रीच्या कड्यासारखे असून त्यांना मी कधीच विसरू शकणार नाही. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी नक्कीच घडवेल असाही विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. येत्या दिवसात पक्षाचे यश हे तुमचेच असेल असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे मला तुमच्याशी भेटता येत नाही. पण लवकरच आपण भेटू असेही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. तसेच पक्षाच्या नोंदणी मोहीमेतही सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केली.
सकाळी ट्विट करत दिल्या होत्या शुभेच्छा
राज ठाकरे यांनी ट्विट करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. हे ट्विट करताना त्यांनी काही विशेष हॅशटॅगचाही वापर केला आहे. #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक असे टॅग वापरले आहेत.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देण्यास वझेंचा नकार
मनसेची सदस्य मोहिम
दरवर्षी ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येतो. परंतु यंदा गर्दी टाळण्यासाठी यंदाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. आज राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते मनसे सदस्य मोहिमेला सुरुवात करणार आहेत, पक्षसदस्य नोंदणीचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. जागोजागी नोंदणी होणार आहे. त्यामुळे गर्दीचा प्रश्न उद्भवणार नाही असे मनसे नेत्यांकडून या आधीच सांगण्यात आले आहे.
अयोध्या दौराही लांबणीवर
मनसे प्रमुख राज ठाकरे हे ९ मार्चच्या वर्धापन दिनापूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. अद्याप या दौऱ्याचं नियोजन झालं नाही. त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौराही लांबणीवर गेला आहे.
हेही वाचा - बाळासाहेबांच्या स्मारकाला निधी मंजूर झाल्याने शिवसैनिकांनी व्यक्त केला आनंद