मुंबई - राजकारणात कोण कधी कोणाचा गेम करेल ( Existence of Thackeray family in Shivsena ) हे सांगता येत नाही. आजवरच्या राजकारणात घराणेशाहीला सुरुंग लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधीपासून ते महाराष्ट्रातील एकेकाळी दबदबा असलेल्या ठाकरेंच्या कुटुंबाचे अस्तित्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ते प्रकार्षाने दिसून येते.
हेही वाचा - बाळासाहेब तुमची प्रॉपर्टी नाही, ते शिवसैनिकांचे दैवत; आमदार शिरसाठ यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
हिंदुत्वाच्या राजकारणात भाजपला डोईजड - भाजप सत्तेवर येताच, प्रतिष्ठीत घराणेशाहीच्या राजकारणाला मूठ माती देण्यास सुरुवात केली. सध्या बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंब यातून जात आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला. सत्तेवर असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचले. शिंदे यानंतर भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्या शिंदे गटाने नंतर संपूर्ण शिवसेनेवर दावा केला. आमदार पाठोपाठ खासदार, आजी - माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना ओढण्यास सुरुवात झाली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपशी पंगा घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत नशीब आजमवणाऱ्या शिवसेनेने सहा जागांवर भाजपला टक्कर दिली. केवळ पाचशे ते हजार मतांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. भविष्यात याचे परिणाम सोसावे लागतील, ही भिती भाजपला होती. त्यामुळे, हिंदुत्वाच्या राजकारणात डोईजड ठरणारी शिवसेना संपवणे, भाजपचे मिशन आसल्याचे बोलले जाते. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अनेकांनी त्यावर शिक्कामोर्तबही केले.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेचे महत्त्व कमी करणे सहज शक्य असल्याची भाजप नेत्यांची पक्की खात्री होती. २०१४ मध्ये तसे प्रयत्न झाले. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप पुढे झुकायचे नाही, असे ठरवून लढा दिला. युती तुटली, परंतु बाळासाहेब ठाकरेंविना उद्धव यांनी ६३ आमदार निवडून आणले. बाळासाहेब हयात नाहीत, राणे यांच्यासारखे रसद पुरवणारे नेता नाही, राज यांच्यासारखा स्टार प्रचारक नसताना जेमतेम वक्तृत्वावर व नेमस्त सैनिकांच्या भरवशावर हळुहळू उद्धव ठाकरे यांनी राजकारणातील सगळे खाचखळगे पार करून मोठी झेप घेतली. तसेच, देशभरात बाळासाहेबांचे सक्षम वारसदार असल्याचे सिद्ध केले.
ठाकरे विना शिवसेना - बाळासाहेब ठाकरेंसारख्या बुलंद नेतृत्वाचा वारसा पुढे चालवताना उद्धव ठाकरे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकीकडे बाळासाहेबांच्या हयातीतच नारायण राणेंसारखे नेते उद्धव ठाकरेंना दोष देत शिवसेनेतून बाहेर गेले होते. तर भाऊ राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडताना उद्धव ठाकरेंकडेच बोट दाखवले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेृतृत्वाबाबत शंका निर्माण झाली होती. आता ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंड केला. ज्या शिवसेनेच्या चिन्हांवर ५६ आमदार निवडून आले. पैकी ४० आमदारांनी शिंदे सोबत जाऊन शिवसेना आमची आहे, असा दावा करू लागले आहेत. त्यामुळे, ठाकरे व्यतिरिक्त शिवसेना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची १९३६ मध्ये स्थापना करून सक्रीय राजकारणात पाऊल ठेवले. दलित, शेतमजूर, असंघटित कामगार यांच्याविषयी पक्षाची भूमिका होती. पुढे आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पक्षांना फुटीर प्रवृत्तींनी ग्रासले. गटबाजी, दुफळी व प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वळचणीला जाऊन मिळाल्याने पक्षाची वाताहत झाली. प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना केली. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) स्थापन केली. आजवर आठवले यांनी एकही आमदार, खासदार नसताना केंद्रात सत्तेची फळे चाखली. मात्र, डॉ. आंबेडकरांच्या वारसांना सक्रीय राजकारणात अपेक्षितपणे पुढे येऊ दिले नाही. काँग्रेसला देखील भाजप सत्तेवर आल्यानंतर याच प्रक्रियेतून जावे लागत आहे.
मत परिवर्तन होईल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकारणातील उंतुग नेतृत्व आहेत. परंतु, डॉ. आंबेडकर यांच्या वारसांना हे जमले नाही, असे म्हणता येणार नाही. आजही आंबेडकरांच्या वारसांचा सन्मान राखला जातो, असे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले. मत परिवर्तनात देखील बदल होतील, असेही त्या म्हणाल्या. पक्षातील घराणेशाही दूर करायची भाजपची निती आहे. देशभरात अनेक प्रयोग राबवलेले पाहिले. महाराष्ट्रातही तोच प्रकार सुरू असल्याचे दिसते, असे त्या म्हणाल्या.
बंडखोरांच्या आडून शिवसेनेच्या वारसांवर टीका - महाराष्ट्रात शिवसेनेच्या जिवावर भाजप वाढला. आज शिवसेनेला संपवण्याचा घाट सुरू आहे. शिंदे सारखे नेते या जाळ्यात अडकले आहेत. परंतु, शिवसेना पक्ष नाही, संघटना आणि विचार आहे. भाजप सारख्या पक्षांना शिवसेनेला येथे टक्कर देणे सोपे नाही. त्यामुळे, बंडखोर नेत्यांच्या आडून शिवसेनेतील वारसांवर टीका सुरू केल्याचे शाखाप्रमुख राजा नाडर यांनी सांगितले.
घराणेशाहीला आव्हान - राजकारणात सध्या घराणेशाहीला आव्हान देण्याचे सत्र सुरू झाले आहे. ज्याच्या नावावर पक्ष चालतो त्याचे वारसदार वाढत असून आपणच कसे खरे हे दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. याला काही अंशी मूळ वारसदार कुठेतरी कमी पडल्याने हे घडते आहे. डॉ. बाबासाहेबांचा वारसा प्रकाश आंबेडकरांपेक्षा रामदास आठवले यांनीच पुढे नेला. ही परिस्थिती सेनेत राज ठाकरेंना मात्र जमली नाही. उद्धव ठाकरेंना आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी मात्र काही अंशी शिवसेनेवर वर्चस्व निर्माण करण्यात यशस्वी पाऊल टाकले. पक्ष वारसा हक्काने मिळाला तरी तो टिकविणे कठीण होत आहे. काँग्रेसचीही तीच अवस्था असून, भावी काळात राष्ट्रवादीलाही याचा फटका बसू शकतो. याचे एकच कारण आहे ते म्हणजे जुन्या नेत्यांची नाराजी. ही सर्वच पक्षात दिसणार आहे हे नक्की. कारण हे सर्व पक्ष घराणेशाही राबविणारे आहेत, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्रीरंग सुर्वे यांनी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - अडीच वर्षे संपत्ती, आता सहानुभूती...संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला