मुंबई- डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केसरबाई इमारतीच्या व डोंगरी परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी सहाय्यक आयुक्त विवेक राही यांना पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी निलंबित केले आहे.
मंगळवारी डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला. केसरबाई इमारतीला लागूनच ही इमारत बांधण्यात आली होती. म्हाडाने ही इमारत आपली नसल्याचे स्पष्ट केले होते. या इमारतीचा 1994 पासून उपकर पालिकेकडे भरला जात होता. याबाबत पालिकेच्या स्थायी समिती पडसाद उमटले होते. सर्व पक्षीय नगरसेवकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे जाहीर केले होते.
बुधवारी स्थायी समितीत भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी कोसळलेल्या केसरबाई इमारतीच्या परिसरात तसेच डोंगरीमध्ये घरांवर माळे बांधून अनधिकृत इमारती तयार होत असल्याचे निदर्शनास आणले होते. त्यासाठी नार्वेकर यांनी छायाचित्र सादर केली होती. यावर आयुक्तांनी चौकशी करून 24 तासात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर गुरुवारी "बी" वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांना निलंबित करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारत दुर्घटननेनंतर अनधिकृत बांधकामांप्रकरणी पहिली कारवाई आहे.