मुंबई - मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही नवीन विषय समोर आले आहेत त्यावर सायंकाळी होणाऱ्या एका बैठकीत चर्चा होईल आणि त्यावर निर्णयसुद्धा अपेक्षित आहे. याचसाठी आज बैठक घेण्यात आली असल्याची माहिती मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागील दहा दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा एक निर्णय आलेला आहे. काही लोकांनी ईडब्ल्यूएसच्या सवलती द्याव्यात म्हणून न्यायालयात अर्ज केला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने आज सायंकाळी होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीमध्ये छंत्रपती संभाजीराजे येणार आहेत. या संदर्भात त्यांचा विषय काय आहे त्यावर चर्चा होईल आणि मुख्यमंत्री यावर निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
फडणवीस यांची तेव्हाची भूमिका आणि फरक
फडणवीस मुख्यमंत्री असताना ते म्हणायचे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा विषय न्यायालयात जाऊन सुटणार आहे. त्यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका आणि आज घेतलेली भूमिका यात बराच फरक आहे. आमचा सातत्याने प्रयत्न असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आहे. यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात चार वेळा अर्ज केलेला आहे. जोपर्यंत घटनापीठ स्थापन होत नाही, तोपर्यंत या विषयाला चालना मिळणार नाही. त्यामुळे जे कुणी राजकीय विधाने करत असतील त्यात स्वारस्य नाही. यावर राजकारण करायचं नाही अशी आमची प्रामाणिक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार महावितरणवर मार्ग काढेल
महावितरणच्या भरती प्रक्रिया संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, महावितरण या प्रकरणात काही लोक कोर्टात गेले आहेत. कोर्टाने निर्णय दिला आहे. यात मार्ग कसा काढायचा त्यावर चर्चा होणार आहे.
फिल्म सिटी कोणी नेऊ शकत नाही
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल विचारले असता चव्हाण म्हणाले की, फिल्म सिटी कोणी कुठे घेऊन जावे, हा विषय आहे. मात्र महाराष्ट्राबाहेर कोणी घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्याकडे चांगल्या सुविधा उपलब्ध आहे. एवढे असतानासुद्धा विक्री लागून जाईल असे मला वाटत नाही, असेंही चव्हाण यांनी सांगितले.