मुंबई - मुंबईतील क्रुझवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत भाजपचे नेते मोहित कंम्बोज यांचा मेव्हुणा ऋषभ सचदेवा याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. पण त्याला नंतर सोडून देण्यात आले.
मुंबईतील भाजपच्या नेत्याने फोन केल्याने ऋषभ याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला होता. या पार्श्वभूमीवर मोहित कंम्बोज यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
त्याचे पुरावे नवाब मलिक यांनी द्यावे -
मोहित कम्बोज म्हणाले की, मी पक्षाचा नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही नाही. मी चैाकशीसाठी तयार आहे. माझ्यावर आरोप लावले की एनसीबीच्या कारवाईत काही लोकांना वाचवण्यात माझा सहभाग आहे. पण माझ्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही आणि मी दीड वर्षापासून राजकारणापासून अप्लित आहे. ऋषभ सचदेवा माझा मेव्हुणा आहे. त्याचा या प्रकरणाशी काय संबध आहे, याचे पुरावे नवाब मलिकांनी द्यावे, आर्यन खान सोबत त्याची कधीही भेट झाली नाही. आम्ही एनसीबीच्या चैाकशीसाठी तयार आहोत.
मोहित कंम्बोज म्हणाले की, नवाब मलिक खुर्चीचा गैरवापर करीत आहेत. ते कचऱ्याचा धंदा करतात, त्यांनी कचरा फेकून द्यावा. त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. त्यांच्यावर मी शंभर कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे मोहित कंम्बोज यांनी सांगितले. मोहित कंम्बोज हे भाजपच्या मुंबई विभागाचे माजी महासचिव आहेत. त्यांच्याविरोधात एका प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा - शाहरुख खानच्या वाहन चालकाला 'एनसीबी'चे समन्स, चालक चौकशीसाठी कार्यालयात हजर
या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. ज्यांनी आर्यन खानला बोलावले त्यांना का सोडण्यात आले, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. यातील ११ जणांची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यातील तीन जणांना सोडण्यात आले. त्यांना सोडण्यासाठी भाजपच्या कोणत्या नेत्याने एनसीबीला फोन केला याचा खुलासा करावा,'' अशी मागणी मलिकांनी पत्रकार परिषदेत केली होती.