मुंबई - एम पश्चिम विभागाने कोरोना काळात फुटपाथवरील फेरीवाल्यांना बंदी केली असली तरी हे फेरीवाले रविवारी (दि. 28 फेब्रुवारी) बिनधास्तपणे पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत विनामास्क व्यवसाय करत होते.
मुंबई शहरातील उपनगरात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असल्याने चेंबूर, टिळकनगर कुर्ला, नेहरू नगर परिसरातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरात रुग्ण संख्या घटविण्यासाठी एम पश्चिम विभातील आरोग्य विभाग कर्मचारी टिळकनगर, चेंबूर, कुर्ला, नेहरूनगर, माहुल, चेंबूर कॅम्प, गोवंडी, झेंडानगरमधील इमारती व झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणात अँटीजन चाचणी व जनजागृती करत आहेत.
तसेच पालिका कर्मचारी व पोलीस विनामास्क फिरणाऱ्याकडून दंड वसूल करत आहेत. यासाठी काही जागृत नागरिक सहकार्य करीत आहेत. या परिसरातील चेंबूर रेल्वे स्थानक, टेम्बे पूल, एन जी आचार्य मार्ग , आंबेडकर उद्यान, चेंबूर कॅम्प , इंलॅक्स रुग्णालय, माहुल परिसरात भाजी मार्केटमध्ये गर्दी होऊ नये म्हणून पालिका कर्मचाऱ्यांनी फुटपाथवरील विक्रेत्यांना गेल्या काही दिवसांपासून तात्पुरती बंदी केली आहे. मात्र, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आपल्यावर कोणीही कारवाई करणार नसल्याने समजून 150 मीटरच्या आतही हे फेरीवाले विनामस्क विक्री करत होते.
चेंबूर रेल्वे स्थानक, चेंबूर टेम्बे पुल, चेंबूर कॅम्प, माहुल एमएमआरडीए इमारत परिसर व वाशीनाका परिसरात अनधिकृत फेरीवल्याचे पेव फुटले आहे. या परिसरातील मार्ग हातगाडी व फेरीवाल्यांनी भरलेले दिसत आहे. या फेरीवाल्याकडून बिनधास्त हलगर्जी बाळगली जात आहे. विनामास्क काही फेरीवाले तर विनामस्क धंदा करताना दिसत आहे. महामारीत काळात पालिका व राज्य सरकारला सहकार्य न करणाऱ्या फेरीवाल्याचे परवाना रद्द करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा - मुंबई कोरोना अपडेट, आज 1051 कोरोनाबाधितांची नोंद