मुंबई - क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानची जवळपास 26 दिवसांनंतर शनिवारी सुटका झाली. याच प्रकरणात अटक झालेला आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट आणि या प्रकरणात आरोपी असलेली मुनमुन धमेचा यांची 27 दिवसानंतर आज जेलमधून सुटका झाली.
मुनमुन आणि अरबाजची सुटका -
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसोबत सहआरोपी असलेल्या मुनमुन धमेचाची रविवारी भायखळा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. तसेच अन्य एक आरोपी असलेल्या अरबाज मर्चंटचीही आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) क्रूझ टर्मिनसवर केलेल्या कारवाईत आर्यन खानसह मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजार रोख रुपये जप्त केले होते.
आर्यनची शनिवारी झाली होती सुटका -
आर्यनला 2 ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्याला एनसीबीने अटक केली. त्यामुळे 2 ते 7 ऑक्टोबरपर्यंत तो एनसीबीच्या कोठडीत होता. त्यानंतर 7 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत तो मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात होता. आर्यनची जामीन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. त्यानंतर तुरुंगातील प्रक्रिया शनिवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर आर्यनला सकाळी 11 वाजता सोडण्यात आले. पहाटे साडेपाचच्या सुमारास कारागृहातील जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यातून आर्यनच्या जामिनाची आवश्यक कागदपत्रे तुरुंग प्रशासनाला प्राप्त झाली होती. आणखी पाच ते सहा कागदपत्रे त्या पेटीत होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आर्यनला आर्थर रोड तुरुंगातून सोडण्यात आले, अशी माहिती तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - मुंबईकरांसाठी खूशखबर : आता लसवंतांना मिळणार लोकलचे तिकीट