मुंबई - राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले नाही. त्यात युतीतील भाजप आणि शिवसेनेने काडीमोड घेतल्याने मुंबईच्या महापौर निवडीत भाजपने आपला उमेदवार देण्याची चाचपणी केली आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या महापौर निवडीच्या निवडणुकीत भाजप कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार? याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. आज सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत महापौर पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शिवसेनेकडून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाला मातोश्रीने हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे.
हेही वाचा... खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी, मृताविरोधातच गुन्हा दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार
जागतिक दर्जाचे शहर व भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. एक कोटीहून अधिकची लोकसंख्या असलेल्या या शहराला महापालिकेकडून सोयी सुविधा पुरवल्या जातात. देश परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचा मान या महापालिकेच्या महापौरांना आहे. राज्यात या एकमेव महापालिकेला 'ए प्लस' हा दर्जा आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प हा साधारणतः 32 हजार कोटींच्या घरात आहे. अशा महापालिकेच्या महापौर पदावर नव्याने कोण विराजमान होणार? याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा... ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार
शिवसेनेकडून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. मात्र, मातोश्रीचा निर्णय शेवटचा असल्याने महापौर पदासाठी अर्ज कोण भरेल? त्यावरून उमेदवार आणि भावी महापौर कोण हे स्पष्ट होणार आहे. यशवंत जाधव महापौर पदावर विराजमान होणार असल्यास त्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्या जागी सध्याच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांची वर्णी मातोश्रीकडून लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा... शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर
कशी असेल निवडणूक प्रक्रीया ?
महापौर पदासाठी सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत अर्ज भरले जातील. 22 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता महापौर निवडणूक आहे. त्यावेळी सभागृहात अर्ज मागे घेता येतील. सभागृहात सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेदरम्यान दोन किंवा अधिक उमेदवार असल्यास मतदान घेतले जाईल. पालिकेच्या नियमाप्रमाणे ज्या उमेदवाराला जास्त मते मिळतात त्याला महापौर म्हणून घोषित केले जाते.