मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. याशिवाय अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ही राजकीय छापेमारी आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, 'अपना टाईम भी आयेगा' अस सूचक इशाराही राऊत यांनी यावेळी दिला आहे.
'दसरा मेळावा होणार'
पुढील वर्षी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आहे. यामुळे दसरामेळावा शिवसेनेचा कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरदेखील संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने होईल, दसरा मेळावा हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलेला आहे. आम्ही देखील तशी तयारी करत आहोत. दसरा मेळावा होणार, आता हळूहळू कालपासून मंदिरे उघडली आहे. नियम पाळून सण साजरे होत आहे. दसरा मेळावा होईल पण कुठे होणार हे आता सांगू शकत नाही, असं राऊत म्हणाले आहेत.
'शिवसेना स्वबळावरची तयारी'
काल संजय राऊत एका कार्यक्रमांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि स्वबळावर निवडणूक लढवू असे विधान केले होते. यावर बोलताना राऊत यांनी सांगितले की शिवसेनेची कायम भूमिका आहे की मुंबईत पक्षाचा विस्तार व्हावा. मुंबईत शिवसेना स्वबळावरच लढत आहे. गेल्यावेळीही आम्ही स्वबळावर लढलो. इथे शिवसेना मोठा पक्ष आहे. तसेच, शिवसेनेला शंभरीच्या वर जागा मिळती. आणि या जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतो आहोत असही राऊत म्हणाले आहेत.
'फक्त माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना त्रास देणे योग्य नाही'
अजित पवारांशी संबंधित असलेल्या कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाकडून नुकती छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवरही त्यांनी कारवाई केली. दरम्यान, अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. यातील चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. अजित पवार यांच्या बहिण विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावरदेखील आयकरच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. या सर्व गोष्टींवर अजित पवार यांनी खेद व्यक्त केला आहे. माझ्यापर्यंत या कारवाया मी एकवेळ समजुन घेईल. परंतु, फक्त माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना त्रास देणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे
हेही वाचा - कोल्हापुरातील अजित पवारांच्या बहिणीच्या घरासह कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे