मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टीलिया इमारतीच्या बाहेर काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला क्राईम ब्रँचचा पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी वाझेला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मुंबई पोलीस आयुक्तांकडून सचिन वाझे या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून घटनेच्या 311 (2)( ब )या कलमानुसार वाझे बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे.
2002 घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट संदर्भातील मुख्य आरोपी ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी तब्बल 17 वर्षे सचिन वाझे यास पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. 2020 मध्ये त्याला पुन्हा एकदा मुंबई पोलीस खात्यात सामावून घेण्यात आले होते. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडून सचिन वाझे यास पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले होते. मात्र 25 फेब्रुवारी 2020 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी याच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून त्यास अटक करण्यात आली होती.
यापूर्वी 'या' पोलीस अधिकाऱ्यांनाही केले होते बडतर्फ -
मुंबई पोलीस खात्यात अशा प्रकारची बडतर्फीची कारवाई या अगोदरही झालेली आहे. यापूर्वी देवनार पोलीस ठाण्यात दत्ता चौधरी या पोलिस निरीक्षकाला लाच घेण्याचा गुन्ह्याखाली सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या शिवाय मुंबई पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव या अधिकाऱ्यावर एका लॉटरी विक्रेत्याचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली त्यास बडतर्फ करण्यात आले होते.