मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधात बॉम्बे हायकोर्टात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या चेंबूरमधील विकासकाकडून स्थानिक पोलीस स्टेशनमार्फत परमबीर सिंग यांनी 200 कोटींची मागणी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
अर्जदार कार्तिक भट यांनी विकासक दिपक निकाळजेसोबत चेंबूर येथे एक झोपडपट्टी पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्प सुरू केल्याचे सांगत साडे तीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष मिठबावकर यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात भट विरोधात साल 2020 मध्ये एफआयआर दाखल केली होती. एफआयआरप्रमाणे तपास न करण्यासाठी चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून आपल्याकडे 200 कोटी रुपयांची लाच मागितली होती.
2018 मध्ये याच गृहनिर्माण प्रकल्पासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरूनच आपल्याकडे खंडणी मागितली असल्याचा आरोपही या अर्जातून कार्तिक भट यांनी केला आहे.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर 14 जून रोजी ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.