मुंबई - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरुद्ध राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. शनिवारी मुंबईतील मोर्चादरम्यान दुर्घटना घडली. मोर्चातील बैलगाडी मोडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व अन्य पदाधिकारी खाली कोसळले. या दुर्घटनेत काही जणांना किरकोळ दुखापत झाली. या प्रश्नावर राजकारण सुरू असले तरी प्राणी मित्रांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगकडे मोर्चामध्ये आणि राजकीय प्रचारात प्राण्यांचा वापर करणाऱ्या पक्षांवर बंदी आणावी, अशी मागणी प्राणीप्रेमी निशा कुंजू यांनी केली आहे. तर याप्रकरणी ऑनलाईन तक्रार देखील दाखल करणार असल्याचे मानद जिल्हा पशु कल्याण अधिकारी सुनिष सुब्रमण्यम यांनी सांगितले.
अन् बैलगाडी कोसळली...
पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या एका आंदोलनात बैलगाडीचा वापर करण्यात आला होता. या बैलगाडीवर भाई जगताप सर्वात पुढे होते. त्यांच्यासोबत जवळपास डझनभर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैलगाडीवर उभे होते. या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्याचदरम्यान, एक कार्यकर्ता जगताप यांच्याकडे सिलेंडर देत असतानाच बैलगाडी तुटली आणि बैलगाडीवरील सर्वजण खाली कोसळले. यावेळी बैलगाडीचे देखील नुकसान झाले आहे.
मदत मिळावी -
बैलगाडीच्या मालकानी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे मागणी केली की माझ्या बैलांना दुखापत झाली आहे. गाडीचे नुकसान झाले आहे. पाच ते सहा हजार रुपये द्यावे, पण काँग्रेसकडून फक्त त्याला हजार रुपये दिवसभराचे भाडे मिळाले. काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांनी त्याबद्दल त्यांनी मागणी केली. पण अद्याप कोणत्याही पद्धतीची मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तक्रार दाखल करणार -
काँग्रेसच्या आंदोलनात बैलांचा केलेला वापर अत्यंत चुकीचा आहे. बैलगाडी कोसळल्यानंतर या बैलांना दुखापत झाल्याचे दिसत आहे. बैलांचा वापर अशाप्रकारे होणे हे अत्यंत चुकीचे आहे. या विरोधात आम्ही अॅनिमल वेल्फेअर बोर्ड तक्रार करणार आहोत. ज्या कोणी या मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलीस स्टेशन देखील तक्रार करणार आहोत, असे सुनिष सुब्रमण्यन मानद जिल्हा पशु कल्याण अधिकारी यांनी सांगितले.
'निवडणूक आयोगाने अशा राजकीय पक्षावर बंदी आणावी'
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरुद्ध राज्यव्यापी आंदोलन सुरू असून शनिवारी मुंबईतील मोर्चादरम्यान दुर्घटना घडली. राजकीय प्रचार आणि आंदोलनासाठी अशा प्रकारे प्राण्यांचा वापर करणे हे अत्यंत चुकीचे आहे या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे अशाप्रकारे फळांच्या वापर करणाऱ्या राजकीय पक्षांवर ती बंदी घालावी, अशी मागणी करणार आहोत. असे प्लांट अँड अॅनिमल्स वेलफेअर सोसायटी मुंबईचे निशा कुंजू यांनी सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीला मिळणार चालना; पर्यटन संचालनालयामार्फत ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धा