मुंबई - बच्चे कंपनी आणि पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र म्हणून राणीबाग (Rani Baug) ओळखली जाते. या राणीबागेत प्राणी, पक्षी पाहायला पर्यटकांची गर्दी होते. आतापर्यत राणीबाग एक प्राणी संग्रहालय म्हणून ओळखली जात होती. राणी बागेत गेल्या वर्षभरात पेंग्विनने दोन पिल्लाना तसेच वाघाच्या मादी बछडीला जन्म दिला आहे. यामुळे गेल्या वर्षभरात राणीबाग पक्षी आणि प्राण्यांचे ब्रिडींग सेंटर (Rani Baug Breeding Center) म्हणून उदयास आली आहे. येत्या काळात राणीबागेत भारतीय वंशाच्या प्राण्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने ब्रिडींग केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
- राणीबागेत २ पेंग्विन, एका वाघाचा जन्म -
राणीबागेत प्राण्यांचे मृत्यू होत असल्याने टीका होत होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची राणीबाग करण्याचे काम सुरू झाले. गेले कित्तेक वर्षे राणीबागेत नूतनीकरण करण्याचे काम सुरु आहे. राणीबागेत २०१७ मध्ये ८ हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. त्यानंतर पेंग्विनच्या जोड्या जमल्यावर एका पिलाला जन्म दिला. मात्र त्या पिलांचा जन्मजात आजारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर १ मे २०२१ ला म्हणजेच महाराष्ट्र आणि कामगार दिनी एका पिलाला जन्म दिला. त्याचे नाव ओरियो असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर मोल्ड नावाचा नर आणि फ्लिपर नावाच्या मादी पेंग्विनने १८ ऑगस्ट २०२१ रोजी एका नर पिल्लाला जन्म दिला आहे. त्याचे नाव ऑस्कर ठेवण्यात आले आहे. यामुळे आता पेंग्विनची संख्या ९ झाली आहे. राणीबागेत १५ वर्षानंतर १२ फेब्रुवारी २०२१ ला बंगाल टायगरची जोडी आणण्यात आली. त्यामधील नर वाघाचे नाव शक्ती तर मादी वाघाचे नाव करिश्मा असे आहे. या वाघांच्या जोडीने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी म्हणजेच बाल दिनी एका नर मादीला जन्म दिला आहे. या मादीचे नाव विरा असे ठेवण्यात आले आहे. राणीबागेत आता ३ वाघ झाले आहेत.
- अशी घेतली जातेय वाघाच्या बछड्याची काळजी -
वाघाकरिता नवीन तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये नैसर्गिक अधिवास निर्मिती धबधबा, पारदर्शक काचेची प्रदर्शनी, अनुकूल लँण्डस्केप इत्यादी तयार करण्यात आले असून या अत्यंत अनुकूल अश्या प्रदर्शनीमध्ये या बंगाल वाघाच्या जोडीने एका मादी बछड्याला जन्म दिला आहे. वाघीण करिष्मा व बछडा "वीरा" सुखरूप असून बछडा आता दोन महिन्याचे झाले आहे. वाघीण करिष्मा तिच्या बछडयाची व्यवस्थित काळजी घेत असून बछड्याची उत्तम वाढ होत आहे. "वीरा" सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहे. पशुवैद्यकांच्या उपस्थितीत फक्त प्राणीपालास बछड्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली असून तिला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
- राणीबाग ब्रिडींग सेंटर -
राणीबागेचे नूतनीकरण केले जात आहे. शिवसेना युवा नेते आणि सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी राणीबागेत ब्रिडींग सेंटर सुरु करावे अशी सूचना केली होती. गेल्या वर्षभरात परदेशी पेंग्विनने दोन पिल्लाना तर बंगाल टायगरने एका मादी बछडीला जन्म दिला आहे. येत्या काळात भारतीय वंशाच्या प्राण्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने ब्रिडींग केले जाणार आहे. ब्रिडींग द्वारे प्राण्यांची संख्या वाढवून इतर प्राणि संग्रहालयाला प्राणी देऊन इतर प्राणी राणीबागेत आणले जातील अशी माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
हेही वाचा - राणीबागेतील वाघाच्या नैसर्गिक अधिवासासाठी सव्वा कोटींचा खर्च; प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीत