मुंबई - परिवहन मंत्री अनिल परब यांचा दापोली येथील रिसोर्ट अनधिकृत असून, तो तोडण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया आज प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत पोहोचले ( Kirit Somaiya In Dapoli ) आहेत. यावर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमैयांना प्रत्युत्तर दिले ( Anil Parab Open Challenge Kirit Somaiya ) आहे. हा रिसॉर्ट माझा नसून किरीट सोमैया हे नौटंकी करत आहेत. याबाबत मी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जाणार आहे, असे परब यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हा रिसॉर्ट माझा नाही आहे - अनिल परब म्हणाले की, या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल आहे. पण, मी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार आहे. माझी प्रतिमा खराब करायची व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम किरीट सोमैया करत आहेत. हा रिसॉर्ट माझा नाही आहे, हे मी अगोदरही सांगितलेले आहे. याबाबत ज्या काही वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशा, कागदपत्रे तपासायचे होते ते सर्व झालेल आहे. यात माझा काही संबंध नाही. किरीट सोमैया वारंवार जाणून-बुजून हा रिसॉर्ट माझा आहे, असे सांगत आहेत. मात्र, किरीट सोमैया हा रिसॉर्ट पाडायला पालिकेचे नोकर आहेत का?, असा प्रश्नही परब यांनी उपस्थित केला आहे.
सर्वांवर किरीट सोमैया हातोडा चालवणार का? - किरीट सोमैया यांच्या अशा वागण्याने कोकणातले सगळे स्थानिक हॉटेल व्यवसायिक भयभीत झाले आहेत. कामगार भयभीत आहेत. कोकणातले जे हॉटेल व्यवसायिक आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये पोलिसांत तक्रार सुद्धा केली आहे. तेसुद्धा आंदोलन करायच्या तयारीत होते. कायदेशीर परवानगी घेऊन याबाबत बांधकाम झालेले असेल तर ज्यांनी परवानगी दिली त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. परवानगी घेऊन जर कोणी बांधकाम केले असेल व जर का ते चुकीचे असेल तर अशी कोकणामध्ये १५० ते २०० रिसॉर्ट आहेत. त्या सर्वांवर किरीट सोमैया हातोडा चालवणार का, असा सवालही परब यांनी विचारला आहे.