मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून 100 कोटी कथित वसुली प्रकरणी तीन दिवसापासून चौकशी सुरू आहे. ईडीकडून चौकशीदरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या 27 कंपन्यांमध्ये व्यवहार झाला असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. यासंदर्भात ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिले होते. ऋषिकेश देशमुख यांनी वकिलाच्या मार्फतच ईडीकडून 7 दिवसांचा वेळ मागवून घेतला आहे.
ईडीकडून 13 तासांच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी दिलेली आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा-100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख मुख्य लाभार्थी; ईडीच्या रिमांड नोटमध्ये उल्लेख
अखेर देशमुख ईडीसमोर हजर-
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडीसमोर हजर झाले होते. अनिल देशमुख हे 1 नोव्हेंबरला ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर झाले होते. परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांप्रकरणी ते ईडीसमोर हजर झाले होते.
हेही वाचा-शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या बेनामी 27 कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू
अनिल देशमुख यांच्यावर आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर महाविकास आघाडीने परमबीर सिंग यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी बोलावले, पण त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंग यांच्याविरोधआत लुकआऊट नोटीस बजाविली होती.
हेही वाचा-अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीची नोटीस, आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले.
- असा आहे घटनाक्रम-
- ईडीने देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले होते. चौकशीसाठी हजर होण्याकरिता ईडीने देशमुख यांना समन्स बजावले होते. चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर 'लूक आऊट' नोटीसदेखील बजावली जाऊ शकते, असेही संकेत ईडीने तेव्हा दिले होते.
- सत्र न्यायालयाचे समन्सदरम्यान, देशमुख ईडीच्या चौकशीला गैरहजर राहत असल्याने 1 ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांना समन्स बजावले होते. 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश कोर्टाने देशमुखांना दिले होते.
- परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी प्राथमिक चौकशी व आवश्यक असल्यास कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयलासुद्धा दिले होते. ईडीने पाचवेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख गैरहजर राहिले होते.
- देशमुख यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानेसुद्धा देशमुखांच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. अद्यापही यावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही.
- अनिल देशमुख वारंवार ईडीच्या चौकशीला गैरहजर राहत असल्याने मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांना समन्स बजावले.
- 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.
- ईडीने देशमुख तपासात सहकार्य करत नसल्यामुळे विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीने देशमुखांची पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावले होते. या समन्समध्ये त्यांना चौकशीच्या अनुषंगाने काही कागदपत्रांसोबत मुंबई येथील कार्यालयात हजार राहण्यास सांगण्यात आले होते.