मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांनी ईडीच्या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेवरील जप्ती उठविण्यात यावी याकरिता आज शनिवार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी 100 कोटीचे कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकत अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबियाकडून सदर मालमत्ता वरील जप्ती उठवण्यात यावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ईडीकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता -
ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4 कोटी 20 लाखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांच्या आणि देशमुख कुटुंबाची कंपनी मेसर्स प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची आहे. आरती देशमुख यांच्या नावावर असलेला 1.54 कोटीचा वरळीचा फ्लॅट आणि कंपनीच्या नावावर धुतूम गांव, उरण, रायगड असलेली 2.67 कोटीची जमीन ईडीने जप्त केली आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हेही वाचा - Omicron In Maharashtra: ओमायक्रॉनचा महाराष्ट्रात शिरकाव! डोंबिवलीत सापडला पहिला रुग्ण