मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर झाले आहेत. मुंबईतील डीआरडीओ येथील कार्यालयात सीबीआयच्या पथकासमोर देशमुख हजर झाले आहेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुखांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. तब्बल नऊ तासानंतर ते सीबीआय कार्यालयातून बाहेर आलेत.
परमबीर सिंगांच्या आरोपांची चौकशी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्यामुळे आता सीबीआयकडून या प्रकरणी अनिल देशमुखांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. तर या चौकशीविरोधात राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
काय आहे प्रकरण?
तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केल्यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात दाद मागण्यासाठी सूचना केली होती. त्यानुसार परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश देत या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार सीबीआयकडून आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे.