मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझें या पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. त्यानंतर परमवीर सिंग यांना त्यांचे मुंबई पोलीस आयुक्तपद गमवावे लागले आहे. मात्र, मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी न लागल्यामुळे राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे हे नाराज असून, त्यांनी तशा प्रकारचे पत्र गृहविभाग व मुख्यमंत्र्यांना लिहून सुट्टीवर गेले आहेत.
हेही वाचा - 'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको', वाझेंची विशेष न्यायालयात याचिका
कोण आहेत संजय पांडे?
1986 च्या आयपीएस बॅचचे असलेले संजय पांडे हे पोलीस महासंचालक पद व मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, होमगार्डचे महासंचालक पद सांभाळत असलेल्या संजय पांडे यांची वर्णी पोलीस महासंचालक पदी किंवा मुंबई पोलीस आयुक्तपदी लागली नसल्यामुळे ते नाराज होऊन सुट्टीवर गेले आहेत. रजनीश सेठ 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणाऱ्या संजय पांडे यांना या पदासाठी निवड करण्यात न आल्यामुळे पोलीस विभागांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांध्ये जुंपली
संजय पांडे सुट्टीवर -
दरम्यान, संजय पांडे यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे ते मोठ्या रजेवर जात असून त्यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ पदाचा पदभार त्यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. तर पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झालेले परमवीर सिंग यांनी सुद्धा अद्याप त्यांना देण्यात आलेल्या गृहरक्षक दलाची जबाबदारी स्वीकारली नसल्याचेही समोर आले आहे.