मुंबई - अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांचे निधन झाल्याने पोट निवडणूक होत (Andheri Bypoll 2022) आहे. त्यांच्या जागी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र लटके या महापालिका कर्मचारी असून त्यांचा राजीनामा पालिकेने मंजूर केलेला नाही. यामुळे त्या उमेदवारी अर्ज भरू शकत नसल्याने उद्धव ठाकरे गटापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यासाठी पालिकेने लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, लटके यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून मुख्यमंत्री दबाव टाकत असल्याचा आरोप केला जात आहे.
उद्धव ठाकरे गटापुढे पेच - अंधेरी पूर्व येथून शिवसेनेकडून रमेश लटके हे २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. काही महिन्यापूर्वी लटके यांचा मृत्यू झाला. यामुळे अंधेरी येथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत अंधेरी येथील के ईस्ट उपायुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या अखत्यारीत नोकरी करत होत्या. त्यांनी महिनाभरापूर्वी नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. यामुळे लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर उद्धव ठाकरे गटापुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.
आयुक्तांची भेट - मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदींनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल आणि सामान्य प्रशासनचे सह आयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेतली आहे. यावेळी लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावर संबधित अधिकाऱ्यांना या प्रकरणी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कायदेशीर बाबांची चाचपणी - ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तो पालिकेने स्वीकारलेला नाही त्यामुळे त्या अर्ज भरू शकतात की नाही याबाबत पक्षाकडून कायदेशीरबाबी तपासल्या जात आहेत. त्यानंतर याचा निर्णय पक्ष घेईल. लटके यांचा राजीनामा मंजूर करू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव पालिकेवर असू शकतो अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी माहपौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.
पालिका नियम काय सांगतो - किमान सेवेची २० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यालाच राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करता येतो. हा अर्ज तीन महिन्यांच्या कालावधीत कधीही मंजूर केला जावू शकतो, परंतु तीन महिन्यांमध्ये यावर कोणताही निर्णय न घेतल्यास आणि संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत न कळवल्यास त्याचा अर्ज मान्य झाला असे गृहीत धरले जाते.