मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri Bypoll) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, त्यांच्याविरोधात शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना व भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण, या निवडणुकीतील धोके लक्षात घेता ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचा प्लॅन B - या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्यासोबतच ठाकरे गडाकडून संदीप नाईक यांनी देखील अर्ज भरला आहे. हा अर्ज भरण्यामागे निवडणुकीत ऐनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये हे कारण असल्याचं अनिल परब यांनी सांगितले आहे. ऋतुजा लटके यांच्या निवडणूक अर्जात एखादी तांत्रिक अडचण दाखवून त्यांचा अर्ज बाद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटाकडून हा प्लॅन बी रेडी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ऐनवेळी जरी निवडणूक आयोगाकडून काही तांत्रिक बाबी दाखवून ऋतुजा लटके यांचा अर्ज रद्दबातल ठरवल्यास संदीप नाईक हा ठाकरे गटाकडे पर्याय उपलब्ध असणार आहे.
छाननीत अर्ज बाद होण्याची शक्यता? - ज्यावेळी ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा वाद सुरू होता त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना 'आमचा प्लॅन बी रेडी आहे. योग्य वेळी आम्ही तो तुमच्यासमोर आणू' अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांचा मार्ग मोकळा झाला होता. पण, निवडणूक उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर देखील त्याची छाननी होते. या छाननीच त्यांचा अर्ज बाद करण्याच्या शक्यता असल्याने ठाकरे गटाकडून हा प्लॅन बी तयार ठेवण्यात आल्याचं अनिल परब यांनी सांगितले.
कोण आहेत संदीप नाईक? - संदीप नाईक हे अंधेरीतील माजी नगरसेवक असून, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, निवडणूक आयोगाने ऋतुजा लटके यांचा अर्ज मान्य करून घेतल्यास संदीप नाईक हे अर्ज मागे घेतील, असे देखील अनिल परब यांनी सांगितले. मात्र, ठाकरे गटाच्या या खेळीमुळे आता फक्त भाजप व शिंदे गटाचे नाही तर खुद्द ऋतुजा लटके यांचे देखील टेन्शन वाढले आहे.
मुरजी पटेल यांनी भरला उमेदवारी अर्ज - अतिशय चुरशीच्या होणाऱ्या अंधेरी पूर्व, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Assembly by-elections ) आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल ( BJP candidate Murji Patel ) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ( Nomination form filled by Murji Patel ) आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना मी 35000 हजार मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.