मुंबई - दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी १ लाख ६७ हजार मतांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाटेत सावंत यांनी देवरा यांचा १ लाख २७ हजार मतांनी पराभव केला होता.
यावर्षी मोदी लाट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नव्हती पण देशभरातील कल हाती येताच पुन्हा एकदा मोदी लाट असल्याचे स्पष्ट झाले. या दुसऱ्या लाटेत सावंत यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडली. सावंत यांच्या विजयात ज्या प्रकारे मोदी लाटेचा वाटा आहे. त्याच प्रकारेच काँग्रेसची अंतर्गत दुफळी ही त्याला तेवढीच जबाबदार ठरली. लोकसभा निवडणुकीच्या आधी केवळ २ आठवडे देवरा यांनी संजय निरुपम याना हटवून मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा ताबा घेतला. त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढीला लागली आणि त्याचा थेट प्रचारावर विपरीत परिणाम झाला.
उच्चभ्रू, अल्पसंख्यांक, जैन आणि मराठी अशा विविध घटकांची मते या भागात आहेत . प्रचाराच्या सुरुवातीलाच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देवरा यांना मतदान करण्याचा आवाहन केले. त्याचा व्हिडिओ देवरा यांनी वायरल केला होता. त्यामुळे मलबार हिल सारख्या उच्चभ्रू भागातले अधिकाधिक मतदान देवरा यांच्या पारड्यात जाईल, असा कयास बांधला जात होता. मलबार हिल भागात सर्वाधिक ५६ टक्के मतदान झाले होते. तसेच शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या वरळी आणि शिवडी विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत कमी मतदान झाले होते. त्यामुळे देवरा यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र ही मते शिवसेनेच्या पारड्यात गेली. दक्षिण मुंबई मतदार संघात झालेल्या एकूण मतदान पैकी ५२ टक्के मते सावंत यांना मिळाली तर देवरा यांना ४०टक्के मते मिळाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे मनसेची मराठी मते देवरा यांना मिळतील, असा अंदाज होता. २०१४ च्या लोकसभेत मनसेचे बाळा नांदगावकर यांना ७० हजार मते मिळाली होती. मात्र या निवडणुकीत ही मराठी मतेही देवरा यांना मिळाली की नाही या विषयी शंका उपस्थित केली जात आहे. शिवडी या भागात मोठ्या प्रमाणात बीडीडी चाळींच्या पुनर्वसचा प्रश्न प्रलंबित आहे . प्रचाराच्या दरम्यान अनेक भागात शिवसेनेच्या सावंत यांना बीडीडी चाळ रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते . त्यामुळे सावंत यांची जागा दोलायमान अवस्थेत असल्याचेही चर्चिले जात होते. पण याचा फायदा देवरा यांना उचलत आला नाही.
दक्षिण मुंबई मतदार संघातील भेंडी बाजार, मोहम्मदली रोड, पायधुनी आणि नागपाडा भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहेत. या मुस्लिम मतदारांमध्येही एमआयएममुळे विभाजन झाल्याचे निदर्शनाला आले. वंचित बहुजन आघाडीत एमआयएम सामील असल्याने काही मुस्लिम मते ही वंचितचे उमेदवार डॉ. अनिलकुमार यांना गेली असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण मुंबई मतदार संघात मोठ्या प्रमाणात गुजराती मारवाडी आणि जैन मतदार आहेत. देवरा हे स्वतः मारवाडी आहेत. त्यांना मारवाडी मते मिळतील, असाही अंदाज होता. मात्र, गुजराती, मारवाडी आणि जैन मते प्रामुख्याने मोदी यांच्या समर्थनासाठी शिवसेनेच्या पारड्यात गेल्याने देवरा यांचे मोठे नुकसान झाले परिणामी अनेक कमकुवत बाजू असतानाही शिवसेनेचे अरविंद सावंत पुन्हा एकदा दिल्लीत पोहचले.
उमेदवारांना मिळालेली मते
- अरविंद सावंत ( शिवसेना ) ४२१९३७
- मिलिंद देवरा ( काँग्रेस ) ३२१८७०
- डॉ. अनिलकुमार ( वंचित आघाडी) ३०३४८