मुंबई - पश्चिम रेल्वेच्या नायगाव -भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलाला एका अज्ञात बोटीने धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातामुळे पुलाचे प्लास्टर निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हाणी झालेली नाही. पश्चिम रेल्वेकडून या अज्ञात बोटी विरोधात गुन्हा नोदं करण्यात आला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अशी झाली घटना -
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या वसई जवळच्या नायगाव रेल्वे पूलाला खालून बेकायदेशीर जहाजाची वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास पुलाच्या खालून बेकायदेशीररित्या बोट जात असताना, या बोटीचा एक भाग पुलाचा पिलरला धडकला. त्यामुळे रेल्वे पुलाला काही ठिकाणी तडे गेले आहे. पुलाचा काही काँक्रिटचा भागदेखील मोठ्या प्रमाणावर निखळून पडला आहे. मात्र, या घटना कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
अज्ञात बोटी विरोधात गुन्हा दाखल -
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, याघटनेची आम्हाला माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे अभियांत्रिकी पथक पाठवून या पुलाला झालेल्या नुकसानाची आम्ही पाहणी केली आहे. तसेच अज्ञात बोटी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे रेल्वे पुलाची मोठी हानी झालेली नसून, रेल्वे पूल सुरक्षित आहे.