मुंबई - मोठे आणि नामवंत चित्रकारांच्या चित्रांचे प्रसिद्ध अशा ठिकाणी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले जाते. असे प्रदर्शन भरवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या पेंटिंग लाखो रुपयाला विकल्या जातात. यातून प्रसिद्ध चित्रकारांना लाखो कोट्यावधी रुपये मिळतात. मात्र या क्षेत्रात आपलं छोटं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणारा लहान चित्रकाराला अशा मोठ्या प्रदर्शनात भाग घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. खास करून मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी त्यांच्यासमोर उभ्या राहतात. चित्रकारांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनासाठी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणीही हजारो चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आतापर्यंत झाली असतील. या प्रदर्शनांना लाखो लोकांनी भेट दिली असतील. मात्र सर्वसामान्य चित्रकारांना देखील अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेरच गेल्या अनेक वर्षापासून होतकरू चित्रकार आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवत आहेत.
प्लाझा आर्टिस्ट असोसिएशनच्या ( Plaza Artists Association ) माध्यमातून जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाजूलाच असलेल्या फुटपाथवर "आर्ट प्लाझा" हे खुले कलादालन आहे. 1988 साली या खुल्या कलादालनाची सुरुवात झाली असली तरी आता मोठ्या प्रमाणात खुल्या कला दालनांमध्ये देशभरातून होतकरू चित्रकार आपल्या चित्रांचे प्रदर्शन रोज फुटपाथवर भरवत असतात. मुंबई हे जागतिक शहर असल्याने जगभरातून पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या खुल्या कलादालनाला रोज शेकडो पर्यटक भेट देतात. यामध्ये विदेशी पर्यटकांची देखील तेवढीच मोठी संख्या आहे. मुंबईत सुरू असलेल्या या खुल्या कलादालनात आतापर्यंत शेकडो चित्रकारांनी आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले. यातून मोठा प्रतिसादही या होतकरू चित्रकारांना इथे मिळाला आहे. अगदी 50 रुपयांपासून 500 रुपये पर्यंत, तर पाचशे रुपयापासून पंचवीस हजारापर्यंतची पेंटिंग्स या खुल्या कलादालनात विकली जातात. या खुल्या कलादालनात आपल्या चित्रांचं प्रदर्शन इमरान खान गेल्या 15 वर्षापासून भरवत आहेत. ट्रॅडिशनल, मिनीचर, मधुबनी पेंटिंग पेंटिंग चे प्रकार ते इथेच रस्त्यावर चित्रित करतात. आणि त्यांची विक्री ही इथेच केली जाते. फुटपाथ लगत असलेल्या जहांगीर आर्ट गॅलरीला पर्यटक भेट द्यायला येत असतात. त्यावेळी आपल्या चित्रांची त्यांच्याकडून खरेदीही होते. खास करून विदेशी पर्यटकांकडून आपल्या कलाकृतीला चांगला प्रतिसाद दिला जात असल्याचे मत चित्रकार इमरान खान सांगतात. इथे सर्व प्रकारच्या पेंटिंग्स असून 500 रुपयापासून 25 हजारापर्यंतच्या किंमतीच्या आहेत.
तर बिहार वरून आलेला मोहम्मद इमतियाज हे गेल्या 14 वर्षापासून इथे आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवतात. मॉडर्न आर्ट पद्धतीचे त्यांचे पेंटिंग असून कमीत कमी ब्रशचा वापर करून केवळ हाताच्या बोटांच्या साहाय्याने चित्र काढण्याची अनोखी पद्धत त्यांची आहे. त्यांच्या कलाकृतीला देखील येथे मोठा प्रतिसाद मिळतो. बिहारमधून आलेल्या मोहम्मद इमतियाज मुंबईत फुटपाथवर आपल्या कलाकृतीला मिळालेल्या प्रतिसादामुळे समाधानी आहेत. मात्र अशा प्रकारची खुली कलादालने अजूनही देशभर झाली पाहिजेत. जेणेकरून गरीब कलाकारांना आपले कला तिथे दाखवता येऊ शकते. पाश्चिमात्य देशात खुली कलादालने मोठ्या प्रमाणात विकसित झाली असली तरी आपल्या देशांमध्ये अजून अशी फूटपाथवर ची कलादालने विकसित नाहीत. इथे खुली कलादालने झाल्यास होतकरू कलाकारांना त्याचा मोठा फायदा होईल असं मोहम्मद इमतियाज सांगतात.
या खुल्या कलादालनात वेगवेगळ्या प्रकारचे चित्रकार आपल्या कलेला वाव देत असतात. फुटपाथ वर बसल्या बसल्या काही मिनिटातच इथे आपले हुबेहूब चित्र बनवणारे कलाकार देखील पाहायला मिळतात. काही वेळातच आपली पेंटिंग्स अगदी दोनशे रुपयात बनवून मिळत असल्याने अनेक वेळा या खुल्या कलादालनात विदेशी पर्यटक किंवा इतर आलेले पर्यटक आपलं चित्र बनवताना दिसतात. या खुल्या कलादालन यामुळे मुंबईत येणारा पर्यटक आणि इथे असलेला कलाकार या दोघांनाही सुखद अनुभव मिळतो.