मुंबई - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी यंदा मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. त्याचबरोबर, शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेकडून नालेसफाई करण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र, पहिल्या पावसानेच मुंबईला वेठीस धरले. मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला.
![amruta fadnavis Tweet](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12071610_thumbn.jpg)
हेही वाचा - #मुंबईत मुसळधार : मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मुंबई प्रशासनावर टीका केली. "जी तोंडापर्यंत उडत होती, आता पायांना चिकटली आहे. पाऊस पडताच मातीची नियत बदलून गेली," अशा आशयचा शेर अमृता फडणवीस यांनी ट्विट केला आहे.
मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य रेल्वेची, तसेच हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. दरम्यान, मुंबई तुंबणार नाही, असा दावा आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांकडून केला गेला होता, मात्र पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. यावरून अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला.
हेही वाचा - नवी मुंबईसह पनवेलमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; वातावरणात गारवा