मुंबई - बॉलीवुडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने त्यांच्या प्रोफाईलवर बच्चन यांचा फोटा काढून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो टाकला आहे.
अमिताभ यांचे ट्विटर अकाउंट 'प्रो पाकिस्तान' या तुर्किश अय्यीलडीझ सायबर आर्मीने हॅक केल्याचा दावा केला आहे. हॅकरने पाकिस्तानचे कौतुक करत त्यांच्या मैत्रीसंबंधाचे गोडवे गायले आहेत. तर रमजान काळात मुस्लिमांवर हल्ले केल्याचा दावा करत भारतावर टीका केली आहे.
हॅकर ग्रुपने आयसलँड रिपब्लिकने तुर्कीश फुटबॉलपटुंशी गैरवर्तणूक केल्याबद्दल जगाचे लक्ष वेधत असल्याचे ट्विट केले आहे. हे ट्विट बिग बींच्या ट्विट खात्यावर अग्रभागी (पीन पोस्ट) ठेवण्यात आले आहे.
बिग बीच्या प्रोफाईलवर 'अभिनेता.. काही जण तसे किमान म्हणतात, लव्ह पाकिस्तान!' अशा शब्दात अमिताभ बच्चन यांची खिल्ली उडविण्याचा हॅकरने प्रयत्न केला आहे.
अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याबाबत सायबर तज्ज्ञांनी तपास सुरू केल्याचे मुंबई पोलिसाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे बिग बी यांचे अकाउंट हॅक करणाऱ्या याच सायबर आर्मीने अभिषेक बच्चन याचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते.
नुकताच भाजपची वेबसाईटही हॅक झाली होती. अमिताभ बच्चन हे ट्विटर सक्रिय असतात. हॅकर हे राजकीय पक्षाप्रमाणे सेलिब्रिटींनाही लक्ष्य करत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.