मुंबई - महानायकानेही कोरोना काळातील कामाचे केले कौतुक तेही आपल्या वडिलांच्या कवितेच्या माध्यमातून (Bachchan praised work of BMC in corona period). बढ़ती हैं लपटें भयकारी; अगणित अग्नि-सर्प-सी बन-बन। गरुड़ व्यूह से धँसकर इनमें, इनका कर स्वीकार निमंत्रण । देख व्यर्थ मत जाने पाये, विगत युगों की शीक्षा-दीक्षा। यह मानव की अग्नि-परीक्षा। या कविश्रेष्ठ हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेतील ओळी उद्धृत करत ज्येष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांनी कोविड काळासारख्या अग्निपरीक्षेदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या अथक - अविरत - अतुलनीय कामांपुढे आपण नतमस्तक असल्याचे आज सांगितले.
पुस्तक महत्त्वाचा दस्तऐवज - बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या कोविड विरोधातील लढाईतील अनुभवांवर आधारित 'मुंबई फाइट्स बॅक' या पुस्तकाचे लोकार्पण केल्यावर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी पुस्तकाच्या सहलेखिका सुमित्रा डेबराय आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना, आपण स्वतः दोन वेळा कोविडने बाधित झालो होतो. त्या आजारातून बाहेरही पडलो. मुंबईसारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या शहरात कोविड विषाणूचा मुकाबला करणे, हे अत्यंत मोठे आव्हान होते. महापालिकेने दिवस रात्र एक करून केलेल्या कामांमुळे मुंबईचा कोविड विरोधातील लढा हा यशस्वी झाला आहे. मुंबई फाइट्स बॅक' हे पुस्तक केवळ आरोग्यदृष्ट्याच नव्हे, तर सामाजिक दृष्ट्या देखील एक महत्त्वाचा दस्तऐवज असल्याचे बच्चन यांनी म्हटले आहे.
भविष्यात व्यवस्थापन करताना उपयोगी - या पुस्तकाबाबत अधिक माहिती देताना काकाणी यांनी सांगितले की, कोविड या साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी 'टीम बिल्डिंग' वर लक्ष केंद्रित करून त्याचवेळी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन आणि विविध स्तरीय उपाययोजनांची परिपूर्ण अंमलबजावणी कशी करण्यात आली, याचा उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोविड विरोधातील लढा लढत असताना आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी राबविलेल्या बाबी यांचीही माहिती या पुस्तकात आहे. भविष्यात साथ रोग विषयक व्यवस्थापन करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी; याचीही रूपरेषा या पुस्तकात आहे, असे या पुस्तकाच्या सहलेखिका व पत्रकार सुमित्रा डेबराॅय यांनी याप्रसंगी सांगितले.