मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच नेते सध्या महाराष्ट्र भर दौरे काढत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच विदर्भ दौरा केला होता. यानंतर ते कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ह्या नेत्यांचे दौरे सुरू असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (amit thackeray) देखील दहा दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. (Amit Thackeray marathwada tour). याआधी त्यांनी कोकण दौरा केला होता.
6 ते 15 ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा दौरा: दसऱ्यानंतर लगेचच सहा तारखेला अमित ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यासाठी रवाना होतील. दहा दिवस ते संपूर्ण मराठवाडा फिरून विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या दहा दिवसात अनेक विद्यार्थी तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अमित ठाकरे बैठका घेतील. तसेच या दौऱ्यात अनेकांचा पक्षप्रवेश देखील होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.
विद्यार्थी सेना वाढवण्यासाठी ठाकरे दौऱ्यावर: मनसेच्या विद्यार्थी सेना अध्यक्ष पदाची धुरा अमित ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र दौरा करण्यास सुरुवात केली आहे. पहिला टप्प्यात त्यांनी संपूर्ण कोकण पिंजून काढला. या दौऱ्यात त्यांनी कोकणपट्ट्यातील विविध भागांमध्ये जाऊन शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांची भेट घेतली. या दौऱ्यामुळे अनेक तरुण मनसेच्या विद्यार्थी सेनेकडे आकर्षित होत असल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता अमित ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर निघाल्याने आता मनसेच्या विद्यार्थी सेनेची मराठवाड्यात देखील ताकद वाढण्याची शक्यता आहे.