नवी मुंबई - राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 'थाळीनाद महामोर्चा' काढण्यात आला. या आंदोनलानंतर महापालिका प्रशासनाने पुढील ३ आठवड्यात किमान वेतन देणार असल्याचे लेखी पत्र मनसेला दिले. महापालिकेच्या पत्रानुसार ६ हजार ५०० कंत्राटी कामगारांना ३ आठवड्यात मिळणार ९० कोटी रुपये मिळणार आहेत.
एकीकडे उद्धव ठाकरे यांचा आज मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी तर दुसरीकडे अमित राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मोर्चा काढला होता. त्यामुळे हा मोर्चा कितपत यशस्वी होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुढील ३ आठवड्यात पैसे मिळणार आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या चेहऱ्यावर गुरुवारी आनंद पहायला मिळाला.
गुरुवारी दुपारी १२ वाजता सिवूडस रेल्वे स्थानक (पश्चिम) पूलाखालून थाळीनाद महामोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यांनतर महापालिका मुख्यालय येथे महामोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या महामोर्चामध्ये तीन ते चार हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. फेब्रुवारी सन २०१५ च्या निर्णयानुसार कंत्राटी कामगारांना किमान वेतन फरक मिळावा, असे राज्य सरकारने आदेश दिले होते. त्यानंतर मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूत करण्यात आली. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरीही मिळाली. तरीही वर्ष संपत येत असतानाही कामगारांचे १४ महिन्यांचे ९० कोटी रुपये थकीत वेतन मिळाले नाही. तसेच उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही कचरा वाहतूक कामगारांचे ४३ महिन्यांचे थकीत वेतन अद्याप मिळालेले नव्हते.
मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच शहर अभियंता यांना अनेकदा भेटून निवेदने दिली होती. तरीदेखील कार्यवाही झाली नाही. कंत्राटी कामगारांबाबत महापालिका प्रशासनाला कोणतेच सोयरसूतक नसल्याचा आरोप मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला होता. अशा स्थितीत झोपेचे सोंग घेतलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना खडबडून जागे करण्यासाठी मनसेने महापालिका मुख्यालयावर गुरुवारी थाळीनाद महामोर्चा काढला.
मोर्चात मनसेचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.