मुंबई - केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराआधी (cabinet expansion modi) बारा मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यातील दोन मंत्री हे महाराष्ट्रातील आहेत. या मंत्र्यांचे राजीनामे का घेण्यात आले, हे अद्याप स्पष्ट नसले, तरी आपल्या खात्यात समाधानकारक काम न केल्यामुळे या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिला असल्याचे मते राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.
हेही वाचा - मोदी मंत्रिमंडळ २.० : नवीन केंद्रीय मंत्र्यांनी स्वीकारला पदभार
मोदी, शाह नाराज?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. या विस्तारामध्ये 43 मंत्र्यांची टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024च्या लोकसभा निवडणुका समोर ठेवून तयार केली. मात्र ही टीम तयार करत असताना आधीच्या मंत्रीमंडळात असलेल्या 12 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे या दोन केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. तर तिथेच रावसाहेब दानवे यांचे खाते बदलण्यात आले. गेल्या दोन वर्षात जे मंत्री आपल्या कामाची छाप सोडू शकले नाहीत, अशा मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, त्याचे अद्याप कारण स्पष्ट नसले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (amit shah) त्या मंत्र्यांच्या कामावर नक्कीच खुश नसणार, म्हणूनच त्यांना राजीनामे द्यावे लागले असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले, त्यांचे भारतीय जनता पार्टी (BJP) पुनर्वसन करणार का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून घेतला जात होता आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गेल्या दोन महिन्यापासून मंत्रीमंडळातील प्रत्येक मंत्र्याच्या खात्याचा आढावा पंतप्रधान स्वतः घेत होते. कोरोनाकाळात आपल्या मंत्र्यांनी कसे काम केले, याचा लेखाजोखा घेतल्यानंतरच नवीन मंत्रीमंडळात कोणाला स्थान द्यायचे, तसेच कोणत्या मंत्र्याला मंत्रीमंडळातून वगळायचे याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात नवीन चेहर्यांना स्थान देत असताना याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(RSS)शी औपचारिक चर्चादेखील होत असल्याचे मत राजकीय विश्लेषक नितीन सावंत यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंळात उच्च पदवी असलेले ३६ मंत्री; २ माजी आयएएस, ४ डॉक्टर, ८ वकील
प्रकाश जावडेकर
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर (prakash javadekar) यांना केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराआधी राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी असताना सुमार कामगिरी केल्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 2016पासून केंद्रीय मंत्रिपदाची धुरा प्रकाश जावडेकर यांनी उचलली होती. मात्र आपल्या कार्यकाळात कोणतेही धोरणात्मक पाऊल उचलले नसल्याने जावडेकर यांच्यावर राजीनामा द्यायची वेळ आली. मात्र 2024ची लोकसभा समोर ठेवून प्रकाश जावडेकर यांना संघटनात्मक बांधणीचे काम दिले जाणार असल्याची चर्चा आता भारतीय जनता पार्टीत सुरू झाली आहे.
संजय धोत्रे
खासदार संजय धोत्रे (sanjay dhotre) अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. मे 2019मध्ये त्यांनी केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. दोन वर्ष त्यांनी मंत्रिपद भूषवले असले, तरी त्यांच्या कामावर केंद्रीय नेतृत्व समाधानी नसल्याचे बोलले जात आहे. खासदार संजय धोत्रे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असल्याने अकोल्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता धोत्रे यांच्यावर कोणतीही नवी जबाबदारी दिली जाणार नाही, असे संकेत आहेत.
रावसाहेब दानवेंचे हात केले बळकट
रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा केंद्रीय राज्यमंत्री ही जबाबदारी आधी देण्यात आली होती. मात्र रावसाहेब दानवे यांच्या कामावरदेखील केंद्रीय नेतृत्व संतुष्ट नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र रावसाहेब दानवे हे मराठवाड्यातील मोठं नेतृत्व आहे. तसेच काही महिन्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद येथील स्थानिक राजकारण पाहता शिवसेनेला शह देण्यासाठी रावसाहेब दानवे यांचे हात केंद्र सरकारला मजबूत करावे लागणार आहेत. महाविकास आघाडी सरकार तयार झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची देखील साथ मिळण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची शिवसेनेवर असलेला नाराजीचा फायदा भारतीय जनता पार्टीला करून घेण्यासाठी रावसाहेब दानवे यांचे हात बळकट केले जात असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तसेच औरंगाबादमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात असल्याने पुढील लोकसभेच्या निवडणुका पाहता रावसाहेब दानवे यांच्याकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांची जबाबदारी देण्यात आली आहे.