मुंबई : शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Sarnaik from Shinde group ) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही आहे. ठाण्यातील ख्रिश्चन समाजाची दफनभूमी ची जागा हडपल्या प्रकरणात ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च ( Our Lady of Mercy Church ) येथील रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तीन ऑक्टोंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
रहिवाशांनी केली जनहित याचिका दाखल : ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च ( Our Lady of Mercy Church ) येथील रहिवाशांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. ठाण्यात ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी जागा अपुरी असल्याचे याचिकेत म्हटले आहे. ठाणे महापालिकेने दोन विकास आराखड्यांत शहरासाठी १० भूखंड राखीव ठेवले होते. मात्र, एकही भूखंड हस्तांतरित केलेला नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
भूखंड हडप केल्याचा आरोप : ठाण्यात दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप करत ठाणेकरांच्या वतीने प्रताप सरनाईक यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. इमारती बांधण्यासाठी भूखंड हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
जीबी रोड जेथे मेट्रो स्टेशन उभारणार : भायंदर पाडा येथे जीबी रोड जेथे प्रस्तावित मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहे. तिथे दफनभूमीसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. या भूखंडाची सद्य:स्थिती पाहण्यासाठी याचिकाकर्ते गेले असता प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ कंपनीजच्या बहुमजली इमारतीसाठी संबंधित भूखंड अनारक्षित केल्याचे समजले. प्रताप सरनाईक यांच्या कंपनीने भूखंड अनारक्षित केल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला. न्यायालयाने सरनाईक यांच्या कंपनीला प्रतिवादी करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली.